Parbhani Gram Panchayat Election Result 2022: गावगाडा हाकणाऱ्या नेत्यांची निवड करणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत परभणीत भाजपने चांगलीच मुसंडी मारली असून थेट 38 पेक्षा जास्त ठिकाणी भाजप विचारांचे सरपंच निवडून आले आहेत. ज्यात सर्वांचे लक्ष लागलेल्या जिंतूर विधानसभा मतदार संघात भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी आपली प्रतिष्ठा राखत राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांना धक्का दिलाय. 


परभणी जिल्ह्यात या टप्प्यात एकूण 127 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडलीय ज्यात सुरुवातीला 10 ग्रामपंचायत या बिन विरोध झाल्या होत्या उर्वरीत 119 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान झाले. ज्याचा निकाल आज त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी जाहीर करण्यात आला. परभणी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर आजपर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेच वर्चस्व गाजवले आहे. मात्र आता हे चित्र काहीसे बदलताना दिसत आहे. यावेळी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच निवडून द्यायचा होता, ज्यात भाजपने जिल्ह्याभरात बाजी मारल्याचे चित्र आहे. दुसऱ्या ठिकाणी गावपातळीवरील स्थानिक आघाड्या ही जोरात होत्या अनेक गावात गाव विकासाबाबत पॅनल उभे होते. त्यांनी राजकीय पक्षांना नाकारून आपल्या हिमतीवर सरपंच निवडून आणले आहेत. ज्यांची संख्या ही 31 पेक्षा जास्त आहेत. या पाठोपाठ राष्ट्रवादीने जवळपास 27 ठिकाणी आपले सरपंच निवडून आणले आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटानेही 15 पेक्षा जास्त गाव काबीज केले आहेत. महत्वाचे म्हणजे 4 गावांमध्ये महाविकास आघाडीचे संयुक्त सरपंच निवडून आले आहेत. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ही जिल्ह्यात 3 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. तर गंगाखेडमध्ये रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गटाचेही 5 पेक्षा जास्त गावात सरपंच झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला मात्र जास्त यश आले नाही. तुरळक ठिकाणीच काँग्रेसचे सरपंच झाले आहेत महत्वाचे म्हणजे सोनपेठ तालुक्यातील दुधगाव मध्ये वंचितने आपला सरपंच निवडून आणला आहे. तसेच शेकाप आणि माकपला ही एक-एक ठिकाणी यश आले आहे.


मतमोजणीनंतर परभणीतील कल्याण मंडपम परिसरात मतमोजणी सुरु असताना वाडी दमई गावातील पॅनल निवडून आल्यानंतर यातील काही कार्यकर्त्यांनी पराभूत पॅनलच्या काही जणांवर दगडफेक केली. ज्यात 3 ते 4 जण जखमी झाले आहेत. तर पुर्णेत ही विजयी जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागलाय. 


एकूणच जिल्ह्यात महाविकास आघाडीची चांगली ताकत असताना भाजपने या निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे जिंतूरमध्ये आमदार मेघना बोर्डीकर, परभणीत महानगराध्यक्ष आनंद भरोसे, गंगाखेडमध्ये भाजपचे मित्र पक्ष असलेल्या रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आपापल्या मतदार संघात चांगलीच कामगिरी करत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांना धक्के दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे.