शेतकरी भावाला दिला मोठा हिस्सा, दोन प्राध्यापक भावांची 'आदर्श' वाटणी; आई बापाचे पांग फेडले, नात्याचं मोलही जपलं
कुठलाही वादविवाद न करता, अतिशय आनंदात हे सर्व घडले, तेही त्यांच्या आई-वडिलांसमोर.
Parbhani:आज भाऊ बंदकीमध्ये शेतवाटणीत एक एक इंचावरून भाऊ भावाचा जीव घेण्याचे, कोर्ट कचेऱ्या करून आयुष्यभर एकमेकांचे तोंडही बघितले जात नसल्याचे अनेक उदाहरण दिसतात. मात्र यातच काही बोटावर मोजण्या इतके अशीही कुटुंब आहेत की जे जमिनीपेक्षा नात्याला मानतात. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील दहिफळे बंधूंनी शेटवाटणीत असाच एक आदर्श घालून दिलाय, ज्याची चर्चा राज्यभर होतेय. पाहुयात एक खास रिपोर्ट.
शेतकरी भावाला दिला मोठा हिस्सा
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खादगाव येथील रंगनाथराव दहिफळे यांचे कुटुंब आहे. त्यांना 3 मुले आणि 1 मुलगी, नातवंड असा मोठा परिवार आहे. मोठा मुलगा प्रा. डॉ. बाळासाहेब आणि लहान मुलगा प्रा. युवराज हे दोघेही प्राध्यापक आहेत. मधला मुलगा केशव शेती करतात. वडिलांची एकूण 16.5 एकर जमीन, गावात घर, जागा असा प्रपंच आहे. 91 व्या वर्षी वडिलांनी “माझ्या डोळ्यासमोर तुमच्या वाटण्या व्हाव्यात” अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर तिन्ही भाऊ, त्यांच्या पत्नी, बहीण अशा सर्वांनी घरच्या घरी बसून वाटण्या केल्या.यामध्ये दोन्ही प्राध्यापक भावांनी, स्वतः नोकरीत असल्याने, शेती करणाऱ्या भावाला 16.5 एकर जमिनीपैकी 9.5 एकर जमीन दिली. स्वतःकडे 3-3 एकर जमीन ठेवली. एवढंच नव्हे, तर शेती करणाऱ्या भावाच्या मुलांचे शिक्षण आणि लग्नाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली. कुठलाही वादविवाद न करता, अतिशय आनंदात हे सर्व घडले, तेही त्यांच्या आई-वडिलांसमोर.