परभणी: अवैध धंद्यांवरून पोलीस आणि रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यात संघर्ष सुरू असतानाच परभणीतील (Parbhani) एका मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्यांने (Parbhani Police) बिल देण्यावरून गोंधळ घातल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मद्यधुंद अवस्थेत त्या पोलिसाने ढाबाचालकाला शिवीगाळ करत दमदाटी केली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात धाबा चालकाने नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मद्यधुंद अशा अवस्थेत तो पोलीस कर्मचारी ढाबा चालकाला शिवीगाळ आणि दमदाटी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे. 


हा पोलीस कर्मचारी परभणी पोलीस मुख्यालय येथे नेमणुकीस आहे. ओंकार मंगनाळे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून तो इतर दोन जणांसह परभणीतील वसमत रस्त्यावर असलेल्या मंत्रालय नावाच्या धाब्यावर जेवण करण्यास गेला होता.  त्या ठिकाणी जेवण केल्यानंतर ढाबा चालकाने त्यांच्याकडून बिल मागितलं. मात्र मद्यधुंद अशा या कर्मचाऱ्याने 'मी पोलीस आहे तू मला बिल मागतो का' असे म्हणत बिल देण्यास नकार दिला.


यावेळी ढाबा चालकाने बिलासाठी वारंवार मागणी केली असता मी पोलीस आहे तुला बघून घेतो असे म्हणत त्याला शिवीगाळ केली आणि धमकी दिली. यावेळी ढाबा चालक राहुल केरबा काळे याने नवा मोंढा पोलीस ठाणे गाठले आणि या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. याबाबत नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेळके यांनी आम्ही त्या कर्मचाऱ्यावर (Nc) म्हणजेच अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. 


दरम्यान, परभणी जिल्ह्यात गंगाखेडचे रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या विरुद्ध पोलिसात अवैध धंदे, हफ्तेखोरीवरून संघर्ष सुरू असताना अशा प्रकारे एका पोलिसाकडून एका धाबा चालकावर बिलासाठी दमदाटी करत शिवीगाळ करण्याचे प्रकरण पोलिसांच्या प्रतिमेला मलिन करणारे ठरणार आहे.


व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर आता नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आता या प्रकरणी परभणी पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार हे महत्त्वाचं आहे.


महत्त्वाच्या बातम्या :