परभणी : पावसाचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्यातील (Marathwada) गोदावरी खोऱ्यात आणायचा आहे. त्यामुळे मराठवाड्यातील मागील पिढीने दुष्काळ पहिला असून, पुढील पिढीला मात्र दुष्काळ पाहू देणार नसल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. परभणी येथील शासन आपल्या दारी (Shasan Aplya Dari) या कार्यक्रमात ते बोलत होते. 


काही भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मराठवाड्यात प्रत्येक चार वर्षांनी दुष्काळाचा सामना करावा लागतो. 2014 साली 53 टक्के पाऊस होता. 2018 साली 64 टक्के पाऊस होता. आता देखील 50 टक्क्याच्या जवळपास पाऊस पडला आहे. त्यामुळे मराठवाड्याला  कायमचा दुष्काळमुक्त करण्याचा आम्ही प्रयत्न करत असून, त्याबाबत आम्ही निर्णय घेतला. त्यासाठी काही उपयोजना केल्या असून, मराठवाडा ग्रीड योजना आणली. यामुळे मराठवाड्यातील धरणे एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एखाद्या भागात पाऊस जास्त झाल्यास तिथून दुसऱ्या ठिकाणी पाणी नेण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले. 


मागील अडीच वर्षात या कामांना ब्रेक लागला होता. पण, आता पुन्हा आम्ही हे काम सुरु केले आहे. मराठवाडा ग्रीड योजनेसाठी आपण केंद्राकडे निधीची मागणी केली असून, आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देतील अशी अपेक्षा आहे. तर पश्चिमी वाहिन्यांचे वाहून जाणारे पाणी आपण गोदावरी खोऱ्यात आणण्याची योजना आणली. पण मागील अडीच वर्षात यावर काम झाले नाही. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात या कामाला देखील आपण गती देणार असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. 


'महिलांसाठी लवकरच मोठा निर्णय घेणार'


सरकारी योजनांबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, "1 रुपयात आम्ही पीक विमा योजना आणली. मला आनंद आहे की 7 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, याचा आम्हाला आनंद आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महिला भगिनींना 50 टक्के सवलत दिली आहे. ज्येष्ठांनाही एसटी फुकट झाली आहे. त्यांनाही सर्व देवदेव करण्यासाठी पाठवता येईल. हे सरकार महिलांच्या संदर्भात मोठा निर्णय घेणार आहे. महिला बचत गटाच्या मुख्यमंत्री एवढे बळ देणार आहेत की महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील. ओबीसींसाठी 10 लाख घरे आपण बांधणार आहोत. देशातील एकही व्यक्ती बेघर असून नये हे पंतप्रधान यांचे स्वप्न आहे. ते स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत."


फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल


यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, "आमचे विरोधक सकाळपासून आमच्यावर टीका करत असतात. सकाळी 9 वाजता एक भोंगा सुरु होतो अन् दिवसभर दुसरे भोंगे सुरु असतात. त्यांच्याकडे बोलायला काहीच नाही. विकासाचा एकही मुद्दा त्यांच्याकडे नाही. माझे त्यांना आव्हान आहे आहे का एक तरी विकासाचा मुद्दा सांगा. फक्त बोटे दाखवून लोकांमध्ये परिवर्तन होणार नाही. जोपर्यंत हे परिवर्तन होत नाही तोपर्यंत आम्ही तिघे गप्प बसणार नाहीत."


हेही वाचा


राज्यातील अनेक भागात पाण्याची परिस्थिती गंभीर, सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून; अजित पवार