परभणी : राज्यातील अनेक भागात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान राज्यातील अनेक भागात गंभीर परिस्थिती असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. सध्याची परिस्थिती पाहता सरकार पाण्याचे नियोजन करत असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच आगामी परिस्थितीचा अंदाज घेऊन अनेक उपयोजना करण्याचा प्रयत्न करत असून, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असेही अजित पवार म्हणाले. परभणीतील शासन आपल्या दारी (Shasan Aplya Dari) कार्यक्रमात ते बोलत होते.


सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी : अजित पवार


पावसामुळे वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. मात्र, अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. यासाठी आम्ही मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आताच काय उपाययोजना करता येईल याचा आढावा घेण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. अनेक प्रकल्पात गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा आहे. मी घाबरवत नाही, पण परिस्थिती गंभीर आहे. या सर्व परिस्थितीचा आम्ही आढावा घेत आहोत. तसेच पाणीसाठा लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. गवताचे लिलाव करु नये, अशा सूचना वन विभागाला देण्यात आल्या आहेत. तर, शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ठोस मदत करण्याचा प्रयत्न आमच्याकडून करण्यात येत आहे. सध्याची परिस्थिती पाहून गाफील राहता कामा नये, पाण्याचे नियोजन करावे लागणार असल्याचे अजित पवार म्हणाले. 


अजित पवार पुढे म्हणाले की, "सध्या कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. परभणीसह संपूर्ण मराठवाड्याला कमी पावसाच्या झळा बसत आहेत. मात्र आम्ही दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी बैठक घेतली. पुढे गणेशाचे आगमन होणार आहे, गोपाळकाला आहे, नवरात्र आहे. पुढे आणखी पाऊस पडायचा आहे.  अद्याप परभणीत 43 टक्के पाऊस पडला आहे. दोन पावसात अंतर मोठं पडलं आहे. मराठवाड्यात केवळ नांदेड आणि हिंगोलीतच थोडी बरी परिस्थिती आहे.त्यामुळे दिलासा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत."


दरम्यान पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, काही लोक समाजात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अल्पसंख्याकांच्या विरोधात हे सरकार असल्याचे सांगतात. पण आम्ही मुस्लीम समाजाच्या भेटी घेऊन त्यांच्या बैठका घेत आहोत. काहीजण महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करतात, असे अजित पवार म्हणाले. 


'शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांना न्याय दिला'


"महाराष्ट्राला महापुरुष संत महात्म्यांची परंपरा लाभलेली आहे. त्यांच्याच विचारांच्या मार्गाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जात आहेत. शासन आपल्या दारातून करोडो लोकांना आपण न्याय दिला आहे. या अभियानामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात चकरा मारायची गरज नाही. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम लोकप्रिय होत चालला आहे. माझ्यासाठी माझ्या महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच आम्ही शासन आपल्या दारी सारखी योजना राबवत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आम्हाला सर्वांनी साथ द्यावी," असं अजित पवार म्हणाले.