परभणी : जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील चिकलठाणा गावच्या पाटीवर लावण्यात आलेले सकल मराठा समाजाचे (Maratha Community) बॅनर अज्ञात व्यक्तीकडून फाडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी या अशा प्रकारची कृती करणाऱ्याला तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी सेलू देवगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले आहे. त्यामुळे घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला असून, पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. 


तर, मुद्दामहून असे कृत्य करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आम्ही शांततेने वागत असताना उगाच मराठा समाजाला डिवचले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर मराठा समाजातील बांधवांनी अचानक सेलू देवगाव महामार्गावर रास्ता रोको केले आहे. त्यामुळे, महामार्गावरील वाहतूक पुर्णतः ठप्प  झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे राज्यभरात गावागावात गावबंदीचे बॅनर लावण्यात आले आहे. असेच काही बॅनर परभणी जिल्ह्यातील अनेक गावात लावण्यात आले होते. तर,  सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथील मराठा बांधवांनी देखील आपल्या गावात गावबंदीचे बॅनर लावले होते. मात्र, हेच  बॅनर काही अज्ञात लोकांनी फाडले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गावकऱ्यांनी आरोपींनी अटक करण्याची मागणी करत सेलू देवगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. तर, याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. 


महामार्गावरील वाहतूक ठप्प...


सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथील मराठा समाजाने लावलेले बॅनर फाडण्यात आल्याने मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहे. त्यामुळे,  सेलू देवगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. अचानक झालेल्या या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यावेळी आंदोलकांनी महामार्गावर दुचाकी आडव्या लावून वाहनं अडवली आहे. तसेच, जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. तर, पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असून, आंदोलकांशी चर्चा सुरु आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Hingoli OBC Sabha : भुजबळांची तोफ पुन्हा धडाडणार, हिंगोलीतील आजच्या सभेतून कोणावर निशाणा साधणार?