हिंगोली : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये (OBC) समावेश करण्याच्या मागणीसह इतर मागण्यासाठी हिंगोलीच्या (Hingoli) रामलीला मैदानावर आज (26 नोव्हेंबर) ओबीसी एल्गार महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या उद्घाटनाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची उपस्थित राहणार आहे. त्यामुळे आजच्या या सभेत भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या सभेला राज्यभरातील ओबीसी बांधव उपस्थित राहणार असून, मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याचा विश्वास आयोजकाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, यासाठी त्यांनी महाराष्ट्राचा दौरा देखील केला. तर, 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावणार असल्याचं सरकारने म्हटले असल्याचा दावा देखील जरांगे यांच्याकडून केला जात आहे. परंतु, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून सरसकट आरक्षण देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांचा विरोध होत आहे. त्यामुळे हा विरोध दाखवण्यासाठी आज हिंगोलीत भव्य ओबीसी सभा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सभेत भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
भुजबळांची तोफ पुन्हा धडाडणार...
मराठा आरक्षणावरून मागील काही दिवसात मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या जालन्यातील अंबड येथील ओबीसी सभेतून भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत टीका केली होती. या टीकेनंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे यांनी आपल्या प्रत्येक सभेतून भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर आता भुजबळ यांची हिंगोलीत सभा होत आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा हिंगोलीच्या सभेतून भुजबळांची तोफ धडाडणार असल्याची चर्चा आहे. तर, आजच्या सभेतून भुजबळ काय बोलणार आणि कुणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
सभेला 'हे' नेते उपस्थित राहणार...
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे आदींची उपस्थित राहणार आहे. विशेष निमंत्रितनामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, नाना पटोले, जयदत्त क्षीरसागर, विनय कोरे, बबनराव तायवाडे, विजय चौगुले, प्रा. टी.पी. मुंडे, शब्बीर अहमद अन्सारी, सुनील महाराज, लक्ष्मणराव गायकवाड, मच्छिद्र भोसले, चंद्रकांत बावकर, कल्याण दळे, राजेश राठोड यांच्यासह स्थानिक नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली आहे.
छगन भुजबळ यांचा हिंगोली दौरा
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे रविवार (26 नोव्हेंबर) रोजी हिंगोली दौऱ्यावर येणार आहेत. तर, सकाळी 9.45 वाजता श्री गुरुगोविंदसिंगजी विमानतळ नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण करतील. सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व वेळ राखीव असेल. नंतर रामलीला मैदान हिंगोली येथे आगमन व ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेस उपस्थिती लावणार. दुपारी 2.30 वाजता हिंगोली येथून कळमनुरीकडे प्रयाण करतील. 2.45 वाजता कळमनुरी येथे आगमन व वेळ राखीव असणार. त्यानंतर 3.15 वाजता मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील.
इतर महत्वाच्या बातम्या:
Prakash Shedge : मागासवर्ग आयोगाकडून होणारे सर्वेक्षण ताबडतोब थांबवा; प्रकाश शेंडगेंची मागणी