Parbhani News : परभणी जिल्ह्यात (Parbhani District) एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, वाळूचा उपसा पकडण्यासाठी नदीत उतरलेला तलाठी पाण्यात बुडाला आहे. पूर्णा नदीपात्रात सेनगाव तालुक्याचा (हिंगोली हद्दीत) लिंबाळा (हुडी) हद्दीमध्ये सुरू असलेला वाळूचा उपसा पकडण्यासाठी हा तलाठी नदीत उतरला होता. मात्र पोहताना दम लागल्याने तो पाण्यात बुडाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर रात्री उशिरापर्यंत पूर्णा नदीपात्रात या तलाठीचं शोध सुरु होता. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुभाष होळ असे या तलाठ्याचे नाव आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार. 25 मे रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास परभणीच्या जिंतूर तालुक्यातील डिग्रसमधील वाळूचा अवैध उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर तलाठी सुभाष होळ, धनंजय सोनवणे, पोलिस पाटील घटनास्थळी गेले होते. मात्र त्या ठिकाणी जिंतूर तालुक्याच्या हद्दीत वाळू उपसा बंद होता. पण त्याच नदीच्या दुसऱ्या भागावर म्हणजेच हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुका हद्दीत वाळू धक्का सुरू होता. तसेच या ठिकाणी कॅनीच्या साह्याने वाळू उपसा सुरू असल्याचे तलाठी सुभाष होळ यांना दिसला. त्यामुळे होळ यांनी पोहत काठावर जाण्याचा प्रयत्न केला. हे. बहुतांश अंतर त्यांनी पार केले. पण मध्येच पाण्यात ते बुडाले. त्यांना दम लागला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेण्यात येत होता.


एनडीआरएफचे पथक बोलावण्यात आले


तलाठी सुभाष होळ पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर सुभाष होळ यांचा शोध घेण्यात आला मात्र ते काही सापडले नाहीत. त्यामुळे शेवटी परभणी येथून एनडीआरएफचे पथक बोलावण्यात आले. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. तर घटनास्थळी महसूल उपविभागीय अधिकारी आरुणा संगेवार, प्रभारी तहसीलदार परेश चौधरी, सेलू तहसीलदार दिनेश झांपले यांच्यासह स्थानिक पोलीस घटनास्थळी तळ ठोकून आहेत. 


महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे वाळू उपसा...


गेल्या काही दिवसांपासून सेनगाव तालुक्यातील लिंबाळा (हुडी) परिसरात पूर्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा सुरू आहे. सेनगाव महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी दिवस-रात्र वाळूचा उपसा चालू आहे. वाळू माफियांच्या दादागिरीमुळे स्थानिक महसूल कर्मचारी, जबाबदार अधिकारी हे या वाळूघाटावर कारवाई करीत नव्हते. मात्र कारवाईसाठी गेलेल्या तलाठी सुभाष होळ पाण्यात बुडाल्याने याला कोण जबाबदार आहे असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


नवीन धोरणामुळे वाळूमाफियांना दुःख! पण आमच्याकडे प्लॅन बी, सी तयार; महसूलमंत्री विखेंचा दावा