Crime News परभणी: माझ्या जखमांवर लवकर टाके का मारत नाही, या कारणावरून मद्यधुंद सराईत गुन्हेगाराने गर्भवती परिचरिकेस अश्लील शिवीगाळ करत मारहाण करून रुग्णालयांची नासधूस केल्याची घटना परभणीच्या जिंतुर शहरातील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर मध्ये घडली. या घटनेनंतर सदर गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिंतूरमध्ये अशा प्रकारे डॉक्टर आणि परिचारिकेवर हल्ला होणारी महिन्यातील ही चौथी घटना आहे.
सेलू येथील इम्रान पाशा कुरेशी हा सराईत गुन्हेगार त्याच्या एका मित्रांसोबत हातावरील जखमेवर टाके मारण्यासाठी जिंतुरच्या ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर मध्ये आला होता. या वेळी कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी दीपा परिहार यांनी त्यास तपासून हातावरील जखमेची पट्टी करण्यासाठी सेवक अमोल सासणीक यास सांगितले. अमोल सासणीक हा अपघातात जखमी असलेल्या दुसऱ्या रुग्णाची मलम पट्टी करत असल्याने त्याने इम्रान पाशा कुरेशी यास थोडावेळ थांबण्यास सांगितले. या वरून त्याचा राग अनावर होऊन त्याने कर्तव्यावर असलेल्या परिचारिका वैशाली गजानन राठोड, वैशाली शेषराव राठोड या दोघींना अश्लील भाषेत शिवीगाळ करत सात महिन्याच्या गर्भवती असलेल्या परिचारिका वैशाली गजानन राठोड यांच्या दोन्ही हातास धरून मारहाण केली. तसेच रुग्णालयातील सामानाची नासधूस केली. यावेळी घाबरलेल्या या परीचारिकांनी पोलिसांना घटनेची माहिती देताच फौजदार देशपांडे हे तिथे हजर झाले. तोपर्यंत उपस्थितांनी इम्रान यास रुग्णालयाबाहेर काढले होते. घाबरलेल्या परीचारिकांनी थेट पोलीस स्थानक गाठून आरोपी विरुद्ध रितसर तक्रार नोंदवली.
एका महिन्यात डॉक्टरांवर चार वेळेस हल्ला-
जिंतूर ट्रामा केअर रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या महिला डॉक्टर परिचारिका यांच्यावर मागील महिनाभरात चार वेळेस हल्ला करण्यात आला असून नेहमीच कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिका डॉक्टर यांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून अश्लील भाषेत शिवीगाळ धक्काबुक्की करण्यात येत आहे. या सर्व प्रकाराकडे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच जिल्हा शल्य चिकित्सक जाणीवपूर्वक कानाडोळा करून प्रकरण मार्गी लावत आहेत. यामुळे डॉक्टरांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर हा प्रश्न निर्माण होत आहे.
संबंधित बातमी:
धक्कादायक! धारधार शस्त्रानं वार करत पतीनं केली पत्नीची हत्या, मिरा रोड हादरलं