परभणी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह अनेक नेते उद्या (26 ऑगस्ट) रोजी परभणी दौऱ्यावर असणार आहे. परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिसरात होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहे. दुपारी साडेबारा वाजता ही सभा सुरु होणार आहे. तर या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. 


‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या अंतर्गत परभणी जिल्ह्यातील विविध विभागामार्फत 1 एप्रिल 2023 ते आजपर्यंत तब्बल 8 लक्ष 74 हजार 738 लाभार्थ्यांना 1446 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला असून, या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अंदाजे 17 हजार 600 लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात विविध विभागाच्या 20 लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहेत. विविध दालनांमध्ये 1200 लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात येतील. लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 400 बसेसची व्यवस्था करण्यात आली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात शासकीय योजनेचा लाभ वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी दिली आहे. 


जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाच्या विविध कामासाठी 23 पेक्षा जास्त नोडल अधिकारी व त्यांना सहाय्य करण्यासाठी 82 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. तसेच प्रत्येक उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय व इतर शासकीय, निमशासकीय कार्यालयाने त्यांच्या स्तरावरुन अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.  तसेच पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून 7 पोलीस उपअधीक्षक, 120 पोलीस अधिकारी आणि साडेआठशेवर पोलीस अंमलदारांचा बंदोबस्त ठेवला आहे. 


एकूण 8 ठिकाणी असेल वाहतूक व्यवस्था


शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात विविध ठिकाणी वाहन पार्किंग व्यवस्था 8 ठिकाणी करण्यात आली आहे. खाजगी चारचाकी वाहन व्यवस्था- शेतकरी भवन आणि प्रशासकीय इमारत परिसर, दुचाकी वाहनांसाठी महादेव मंदिर परिसर तर जीप, क्रुझर आदी चारचाकी वाहनांसाठी देवगिरी वसतिगृह परिसरात व्यवस्था करण्यात आली आहे. 


परभणी, मानवत, सोनपेठ तालुक्यातील लाभार्थ्यांच्या बसकरिता वैद्यनाथ वस्तीगृह मैदानावर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तर जिंतूर, सेलू व पाथरी तालुक्यातील लाभार्थी घेऊन येणारी बस वाहने पशु वैद्यकीय कॉलेज मैदानावर उभी करण्याची सोय करण्यात आली आहे. गंगाखेड, पालम व पुर्णा तालुक्यातील लाभार्थ्यांना घेऊन येणाऱ्या बस अॅग्रोनॉमी विभाग समोरील पार्किंग येथे करता येती. व्हीआयपींच्या वाहनांसाठी कृषी महाविद्यालय समोरील परिसरात पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


शरद पवारांनंतर आता अजित पवारांची उद्या बीडमध्ये सभा; उत्तर देणार की विकासावर बोलणार?