Republic Day In Parbhani: देशभरात आज मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जात आहे. दरम्यान परभणीच्या (Parbhani) प्रियदर्शिनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाचे मुख्य ध्वजारोहण समारंभ त्यांच्या हस्ते पार पडला. मात्र यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या बालविवाहमुक्त परभणी या सेल्फी पॉईंटने सर्व उपस्थितांचे लक्ष वेधले. तर जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्यासह कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी या 'बालविवाहमुक्त सेल्फी पॉईंट'वर (Child Marriage Free Selfie Point) सेल्फी घेतल्या. 


परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या महत्त्वाकांक्षी ‘बालविवाहमुक्त परभणी' हे आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभाचे प्रमुख आकर्षण ठरले. जिल्ह्यात होणारे बालविवाह पूर्ण प्रशासकीय क्षमतेने रोखण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे दिसून आले. पथसंचलन करणाऱ्या सर्व पथकांच्या हातात ‘बालविवाहमुक्त परभणी’चे फलक झळकत होते आणि ते उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. येथील सेल्फी पॉईंट, चित्रफलक, विविध शासकीय विभागांचे चित्ररथ, जिवंत देखावे, बालविवाह केल्यास होणारी शिक्षा, त्यात शिक्षा होणाऱ्यांचा समावेश यात दिसून येत होते. 


बालविवाहाच्या यादीत परभणी वरच्या क्रमांकावर


राज्यात बालविवाह प्रथेमध्ये परभणी जिल्हा वरच्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यासाठी ही चांगली बाब नाही, त्यामुळे आता जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने बालविवाहमुक्त परभणी मोहिमेत सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आज येथे केले. जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी ग्रामीण भागातील शालेय शिक्षणात मुलींची पटसंख्या वाढली पाहिजे. मुलीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या जाणिवेच्या क्षमता विकसित होतात. त्यामुळे मुलींच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यास शारीरिक, मानसिक असा सर्वांगिण विकास होतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांसह सर्व प्रशासकीय यंत्रणांनी परभणी जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकारी गोयल यांनी केले. 


उत्कष्ट कामगिरीबद्दल बक्षीस वितरण


इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जुलै 2022 च्या राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या आर्यन शिंदे आणि आदित्य नांदुरे, सायली भोंगे आणि सुदर्शन नखाते यांचा जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. तसेच एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालय आणि मानवत मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राष्ट्रपती पदक घोषित झालेल्या होमगार्ड पथकाचे तालुका समादेशक अधिकारी परमेश्वर जवादे यांचाही जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Parbhani: बालिकेवर अत्याचारप्रकरणी जामिनावर सुटला अन् बाहेर येताच पुन्हा दुसऱ्या मुलीवर अत्याचार! परभणीच्या सेलूमधील संतापजनक घटना