Parbhani Crime News: परभणी जिल्ह्यात (Parbhani District) एक संतापजनक घटना समोर आली असून, बालिकेवर अत्याचारप्रकरणी शिक्षा (Punishment) भोगत असलेल्या आरोपीने जामिनावर बाहेर येताच आणखी एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. रामेश्वर विष्णू पौळ (वय 27 वर्षे)  असे या नराधमाचे नाव आहे. तर याप्रकरणी मंगळवारी रात्री आठच्या सुमारास सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एका गावामध्ये राहणाऱ्या फिर्यादीच्या मुलीस गावातील रामेश्वर विष्णू पौळ (वय 27) याने तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. तुला मी चार्जर देतो, ते चार्जर एकास नेऊन दे, असे म्हणून घरात नेले. त्यानंतर आरोपी रामेश्वरने त्याच्या घराचा दरवाजा बंद करून मुलीवर अत्याचार केला. या घटनेने मुलगी प्रचंड घाबरून गेली होती. त्यामुळे तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. 


पोलिसात गुन्हा दाखल 


रामेश्वर विष्णू पौळ याने आपल्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची माहिती पीडीत मुलीने आईला देताच मुलीच्या आईने  सेलू पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. मुलीच्या आईच्या फिर्यादिवरून सेलू पोलिसांनी आरोपी रामेश्वर विष्णू पौळ याच्याविरुद्ध बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत सहकलम आठमध्ये पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. तर पोलसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून, न्यायालयाने त्याची रवानगी परभणी कारागृहात केली आहे. 


दोन महिन्यापूर्वी मिळाला जामीन! 


दरम्यान आरोपी रामेश्वर विष्णू पौळ याने 2020 साली तालुक्यातील एका गावातील 9 वर्षीय बालिकेवर अत्याचार केला होता. याप्रकरणी तत्कालीन पोउपनि जसपालसिंग कोटतीर्थवाले यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर हे प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयात चालले. न्यायालयाने या प्रकरणात आरोपी रामेश्वर पौळ यास तीन वर्षांची शिक्षा सुनावल्याने त्याची परभणी कारागृहात रवानगी झाली होती. दरम्यान, आरोपीने या निर्णयाविरोधात वकिलामार्फत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. ज्यात जामिनासाठी दिलेला अर्ज दोन महिन्यांपूर्वी मंजूर झाल्याने रामेश्वर पौळ हा गावात आला होता. पण त्यांनी मंगळवारी पुन्हा तोच गुन्हा केला. त्यामुळे दुसया गुन्ह्यात त्याची पुन्हा परभणी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या:


गावातील रोड रोमिओकडून मुलींची छेड, शिक्षकांनाही केली धक्काबुक्की, परभणीतील धक्कादायक प्रकार