परभणी : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) झालेल्या नुकसानीची आज स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) तसेच आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी एकत्रितरित्या पाहणी केली. मानवत तालुक्यातील रामेटाकळी आणि वझुर या गावात त्यांनी भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या समोर आपला आक्रोश सांगितला तसेच प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी या सर्वांना बच्चू कडू आणि राजू शेट्टी, संभाजी राजेंनी चांगलेच धारेवर धरले. तर एकीकडे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झालेले असताना दुसरीकडे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)आयोजित केलेल्या कार्यक्रमावर तिन्ही नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला. 


कृषिमंत्र्यांना लाज वाटायला हवी : राजू शेट्टी


राजू शेट्टी म्हणाले की, प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. जवळजवळ सात ते आठ दिवस झाले तरी इथे पंचनामे केलेले नाहीत. खरंतर 24 तासाच्या अनुग्रह अनुदान मिळणे अपेक्षित होते. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने मदत जाहीर करणे अपेक्षित होते. परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. इथून 50 किलोमीटरच्या अंतरावर कृषिमंत्री मोठा सांस्कृतिक कार्यक्रम करतात आणि इथे लोकांचा रोष सुरु आहे. यांना जरा तरी लाज वाटली पाहिजे. लोकप्रतिनिधी असे वागत असतील तर लोकांनी आता विचार करावा की, काय पातळीच्या लोकांना आम्ही निवडून दिले आहेत. संकटकाळात हे लोक जर मदतीला येणार नसतील तर हे काय उपयोगाचे आहेत? कृषी मंत्र्यांना लाज वाटायला हवी. आता लोकांनी जोडे हातात घेऊन उभे राहील पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. 


सरकारच्या कानफाडात मारण्याची वेळ : बच्चू कडू


तर, बच्चू कडे म्हणाले की, कलेक्टर काय करताय हे मला माहित नाही. ते म्हणताय नुकसान इतके झाले की आम्ही मदत देऊ शकत नाही. 24 तासाच्या आत सानुग्रह अनुदान दिले पाहिजे.  प्रशासन करत नसेल तर कारवाई झाली पाहिजे. तलाठ्यांनी तीन तारखेला पंचनामा केले आणि आजपर्यंत दाखल केलेले नाहीत. तर पंचनामे करून अर्थ काय?  सरकारच्या कानफाडात मारण्याची वेळ आलीय, अशी टीका त्यांनी केली. 


कृषिमंत्री सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न : छत्रपती संभाजीराजे


छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, त्यांनी इथे येऊन बघावं. मी शेतात जाऊन पाहणी केली. मी गाडीतून पाहणी केलेली नाही. बाकी आमदार, खासदारांना इथे यायला वेळ नाही का? कृषिमंत्र्यांनी तर इथे यायलाच पाहिजे ना. तुम्ही कृषिमंत्री आहात. हा विषय इतका नाजूक बनला आहे की, अशा वेळेस कृषिमंत्र्यांनी इथे येऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला हवेत. नुकसानीचे पंचनामे व्हायलाच पाहिजे. शेतकऱ्यांची अवस्था पाहून मला वेदना झाल्या. कृषिमंत्री इकडे यायचे सोडून बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत. हे बरोबर आहे का? हे महाराष्ट्राला शोभते का? कृषिमंत्र्यांना हे शोभते का?  शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करणे सोडून कृषिमंत्री सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न असल्याची टीका त्यांनी यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर केली. 


अनिल पाटलांनी केली नुकसानीची पाहणी 


दरम्यान, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज नांदेडमध्ये अतिवृष्टीतीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. कासारखेडा, निळा, आलेगाव येथे शेतात जाऊन अनिल पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नांदेड जिल्हयात जवळपास साडे चार लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालं आहे. राज्यभरात अंतिम पंचनामे पुर्ण झाल्यावर, मदत देण्याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल, असं अनिल पाटील म्हणाले. महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं हित बघितलंच पाहिजे. निवडणुका येतील आणि जातील, पण शेतकरी संकटात सापडलेला आहे. त्यांना तातडीनं मदत देण्याची शासनाची भूमिका असल्याचे अनिल पाटील यांनी सांगितले.


आणखी वाचा 


कृषिमंत्री धनंजय मुंडे बांधावर पाहणीसाठी गेले पण गाडीतून पाऊलही बाहेर टाकलं नाही, शेतकऱ्यांच्या अंगावर वसकन ओरडले : संजय राऊत