Ratnakar Gutte : शांतता समितीच्या बैठकीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी उपस्थित असताना थेट पोलीस हफ्ते घेतात, असा आरोप करत हे हफ्ते घेणे बंद करण्याचा सल्ला देणाऱ्या रासप आमदारांवर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा रासप आमदार रत्नाकर गुट्टे आणि स्थानिक पोलिसांत संघर्षाची चिन्हे आहेत.. 


गंगाखेड येथील संत जनाबाई मंदिरातील सभागृहात 29 ऑगस्ट रोजी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी श्रेणिक लोढा, गंगाखेड महसुलचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्यासह इतर स्थानिक अधिकारी, शांतता समितीचे सदस्य व गंगाखेडकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डायसवर बोलताना गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी थेट गंगाखेड मधील पोलीस अधिकारी हफ्ते घेतात, हे हफ्ते घेणे बंद करा असे म्हणाले होते. या वक्तव्यानंतर त्यांना गंगाखेड चे एपीआय माने यांनी हटकले असता त्यांना ही गुट्टे यांनी ये तू चूप बस मध्ये बोलू नकोस, असे म्हणत दम भरला होता. यांनतर  उपविभागीय पोलीस अधिकारी श्रेणिक लोढा यांनी तुम्ही पुरावे द्या आम्ही कारवाई करू, पण अशी जनतेसमोर बदनामी करू नका असे समजावून सांगितले होते. परंतु गुट्टे शांत झाले नाहीत, तेव्हा गुट्टेच्या पदाधिकाऱ्यांनी गुट्टे यांना शांत केले. हा वाद झाल्यानंतर आज पोलिसांनी या प्रकरणात रत्नाकर गुट्टे यांच्यावर पोलीस दलाची बदनामी केल्याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४१२/२०२२ कलम ५०० भा दं वि व कलम ३ पोलीस अधिनियम १९९२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गंगाखेड मध्ये गुट्टे आणि पोलिसांत संघर्षाची चिन्हे आहेत.


मी माझ्या मतावर ठाम असुन अवैध धंदे बंद करेपर्यंत माझा संघर्ष सुरूच राहणार-आमदार गुट्टे 
मी त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या माझ्या मतावर ठाम असुन गंगाखेड मध्ये अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादाने सुरु आहेत, याचे उत्तर पोलिसांनी द्यावे. पोलिसानी माझ्यावर किती हि गुन्हे दाखल केले तरी जोपर्यंत तिथले अवैध धंदे बंद होत नाहीत तोपर्यंत माझा संघर्ष सुरूच राहील अशी प्रतिक्रिया आमदार रत्नाकर गुट्टे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.