Pankaj Bhoyar Threat on Social Media : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला कोणाची रसद आहे, याची माहिती आमच्या नेतृत्वाकडे आहे. योग्यवेळी आमचे नेतृत्व त्याचा खुलासा करेल, असा खळबळजनक दावा राज्याचे गृहराज्य मंत्री पंकज भोयर यांनी केला होता. दुर्दैवाने मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाच्या (Maratha Reservation Protest Azad Maidan) माध्यमातून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे. आपल्या मागण्या जबरदस्तीने सरकारकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असेही ते म्हणाले होते. दरम्यान, याच मुद्द्यांवरून गृहराज्यमंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांच्यावर अश्लील भाषेत शिवीगाळ करत सोशल मिडियावरुन धमकी देण्यात आली आहे.
पंकज भोयर पोलीस तक्रार करण्याची ही आता शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, ‘आम्ही धाराशिवकर’ या फेसबुक पेजवरुन पंकज भोयर यांना आई- बहिणीवरुन शिवीगाळ करण्यात आली आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कोण रसद पुरवतं? याची नावं जाहिर करण्याचा इशारा पंकज भोयर यांना यावेळी दिला आहे. दरम्यान, शिवीगाळ आणि धमकी प्रकरणात पंकज भोयर पोलीस तक्रार करण्याची ही आता शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत पंकज भोयर ओबीसींची बाजू मांडत असल्याने त्यांना ही शिवीगाळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले होते पंकज भोयर
दरम्यान, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी नुकतेच नागपुरात सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषण आंदोलन स्थळी पोहोचले होते. मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठीच आंदोलन मुंबईत सुरू असताना ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्यात येऊ नये, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे चार दिवसापासून नागपूरातील संविधान चौकावर साखळी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. विदर्भातील भाजपसह अनेक पक्षातील लोकप्रतिनिधी ओबीसींच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आंदोलन स्थळी येत आहेत. त्यातच काल वर्धाचे आमदार व राज्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर ही या ठिकाणी पोहोचले होते. सरकार म्हणून आंदोलकांना आश्वस्त करतो की सरकार ओबीसीमधून सरसकट मराठ्यांना आरक्षण देणार नाही. असे स्पष्टीकरण यावेळी पंकज भोयर यांनी दिलं होतं.