पालघर : मोखाडा (Mokhada)  येथील गेल्या महिन्यात एका अल्पवयीन मातेचा बाळासह मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना जिल्ह्यातील सुमारे 36 हजार गरोदर मातांपैकी तब्बल अडीच हजार गरोदर महिला या 19 वर्षाखालील असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अल्पवयीन मातांकडून होणाऱ्या प्रसुतीनंतर अशा मुलांमध्ये कुपोषणाची समस्या तसेच माता आणि बालमृत्यू   होण्याची शक्यता बळावत आहे.


जिल्ह्यात अनेकदा माता, नवजात बालके यांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत असून कमी वयातील प्रसूती हेच त्यामागील प्रमुख कारण आहे. जिल्ह्यात 19 वर्षाखालील असलेल्या 2462 गरोदर महिलांपैकी 543 महिला डहाणू तालुक्यातील असून जव्हार, तलासरी, पालघर, विक्रमगड, मोखाडा व वाडा तालुक्यातील या वयोगटातील गरोदर महिलांची संख्या लक्षणीय आहे. अल्पवयीन मुली गरोदर राहिल्याची माहिती उघकीस आल्यास पोलिसांची कारवाई होईल या भितीपोटी अल्पवयीन असणाऱ्या मातांची माहिती दडवून शासनापर्यंत पोहोचवली जात नाही. सुदृढ बालक आणि सुरक्षित माता, बालविवाह रोखणे यासाठी अजूनही पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती व पोलीस कारवाईची आवश्यकता असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.


बालविवाह होण्याचे प्रमाण जास्त


 पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भाग हा आदिवासी बहुल असून त्यांच्या विकासासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. परंतु असे असले तरीही आदिवासी समाज आरोग्य,शिक्षण या संबंधी अजूनही जागरुक नाही. आरोग्याच्या काही समस्या असल्यास अजूनही भगत, बुवा यांच्याकडे जाण्याचं प्रमाण अधिक आहे. अनेकदा पालक मुलांना शाळेत पाठवण्यास फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येतात. बालविवाह कायदा येऊन अनेक वर्षे उलटले परंतु जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणात बालविवाह होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अनेकदा 15 ते 17 वर्षांच्या अल्पवयीन माता झाल्याचे पाहायला मिळते. अल्पवयीन मुलीस गर्भधारणा झाल्यास रुग्णालयात न नेता गावातील दाईकडून तिची प्रसुती करून घेतली जाते. त्यामुळे संस्थात्मक प्रसुती होण्याचे प्रमाण जिल्ह्यात 100 टक्के होण्यास मर्यादा येत आहेत.


आरोग्य विभागाकडून या गंभीर विषयाकडे डोळेझाक


18  वर्षांखालील बालकांचे लैंगिक छळ आणि शोषण यापासून संरक्षण करण्यासाठी कायदेशीर तरतूद मजबूत करण्यासाठी पॉक्सो कायदा तयार करण्यात आला. या कायद्यानुसार 18 वर्षाखालील मुलीसोबत शरीरसंबंध ठेवणे हा गुन्हा आहे. मुलीची सहमती असेल किंवा तिचा बालविवाह जरी लावून दिला असला तरीही शरीरसंबंध ठेवणे हा पॉक्सो कायद्याने गुन्हा आहे. परंतु पतीवर कारवाई होईल या भीतीने महिला कोणतीही माहिती देत नाही. तर आरोग्य विभागाकडून या गंभीर विषयाकडे डोळेझाक होत असल्याचाही चित्र निर्माण झाला आहे. महिलांना गर्भधारणा झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून मातांना अनेक सोयीसुविधा पुरविल्या जातात. अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्यांना या सुविधा पुरवितात. अंगणवाडीमध्ये नोंदणी करताना चौकशीचा ससेमिरा नको म्हणून वय कमी असले तरी 18 वर्षे वय पूर्ण असल्याचे सांगून त्याची खातरजमा न करता नोंदी केल्या जातात. अंगणवाडी, आरोग्य विभाग यांनी नोंदणी करण्यापूर्वी जे वय सांगितले जात आहे त्याची खात्री केली तरच अशा गोष्टींना आळा बसेल. गावात लपून-छपून बालविवाह होत असल्यास तो तात्काळ रोखण्यासाठी सरपंच, पोलीस पाटील यांनी भूमिका घेणे आवश्यक आहे.


जिल्हा परिषदेकडून ठोस कारवाई करणार 


पालघरचे जिल्हा परिषद पालघरचे  अध्यक्ष   प्रकाश निकम म्हणाले,  बालविवाह, अल्पवयीन माता मृत्यू रोखण्यासाठी जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. याबाबत जिल्हा परिषदेकडून ठोस कारवाई करण्यात येणार आहे. 


हे ही वाचा :


माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात