Palghar Rain: पालघर जिल्ह्यात आठवडाभरात झालेल्या मुसळधार आणि ढगफुटी सदृश्य पावसाने हाहा:कार माजवला. विशेषतः पालघर, डहाणू, जव्हार, विक्रमगड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नदी-नाल्यांना पूर आला होता. पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते, घर आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तर जिल्ह्यातील विविध ठिकाणी 21 जणांचा पुरात (Flood) वाहून जाऊन मृत्यू झाला आहे. 


मृतांची तालुकानिहाय संख्या



  • पालघर - 6 

  • डहाणू - 4 

  • वसई - 4 

  • तलासरी - 1

  • वाडा - 1

  • विक्रमगड - 1

  • जव्हार - 4


पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी आज डहाणू (Dahanu) तालुक्यातील वाघाडी, वेती या परिसरात पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. महसूल विभागाअंतर्गत  मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले, तर नुकसानग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट आणि आर्थिक सहाय्य करण्यात आलं आहे.


सुर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातून चुकीचा विसर्ग करण्यात आल्याने सुर्या नदीच्या काठावर असलेल्या अनेक गावांमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे शेती आणि घरांचं नुकसान झालं, तर काहीजण पुरात वाहून त्यांचा मृत्यूही झाला. दरवर्षी धरण 65 ते 70 टक्के भरल्यावर पाण्याचा विसर्ग करण्यात येतो, मात्र यावेळेस धरण 100 टक्के भरल्यानंतर अचानक 200 सेंटीमीटरने दरवाजे उघडून हा विसर्ग करण्यात आला. याला सर्वस्वी जबाबदार सुर्या प्रकल्प पाटबंधारे विभाग असल्याचा आरोप आमदार श्रीनिवास वनगा यांनी केला आहे, तर याबाबतीत अधिवेशनातही प्रश्न मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.


पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा


पालघर जिल्ह्यात जवळपास 75 हजार हेक्टरवर भात शेती केली जाते तर, उर्वरित क्षेत्रावर बागायती शेती होते. पालघर जिल्ह्याबरोबरच जव्हार तालुक्यातील वडोली खरोंडा पिंपळशेत या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे काही वेळातच नद्यांना आलेल्या पुरामुळे पुराचं पाणी थेट गावामध्ये शिरलं होतं. आताच रोपणी झालेल्या भात शेतीचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.


शेती, घरांसह रस्त्यांचंही नुकसान


दुसरीकडे काही क्षणातच याच पुराचं पाणी घरांमध्ये शिरलं, त्यामुळे घरातील माणसांनी कुटुंबासह आपला जीव वाचवण्यासाठी टेकड्यांवर पळ काढला. पुराच्या पाण्यामुळे घरातील सामानाबरोबरच जीवनावश्यक वस्तू, महत्त्वाचे कागदपत्र आणि विद्यार्थ्यांच्या दप्तराचंही मोठ्या नुकसान झालं असून घरामध्ये चिखल पसरला होता. पुराच्या पावसामुळे खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rain Update: राज्यातील पावसाचा जोर ओसरला; पण 'या' दिवसापासून पाऊस पुन्हा वाढणार