Palghar Rain : मुसळधार पावसामुळे (Maharashtra Rain Update) सकाळपासून जनजीवन विस्कळीत झालं असताना आता पालघरमधून (Palghar) धक्कादायक बातमी समोर आली आहे. पावसाचे पाणी साचून तुडूंब भरलेल्या खड्ड्यात पडून  दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. बोईसर-नवापूर रोडवर ही घटना घडली, यानंतर संतप्त स्थानिकांकडून बोईसरमध्ये रास्ता रोको करण्यात आला.


खड्ड्यात बाईक आदळल्याने गमावला जीव


माहीर मोशीन शिवानी या दीड वर्षीय चिमुकल्याचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला. आई-वडिलांसोबत बाजारपेठेत जात असताना खड्ड्यात बाईक आदळल्याने हा अपघात घडला. या अपघातानंतर जमावाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. 


संतप्त स्थानिकांची एमआयडीसी बांधकाम विभागावर आगपाखड


या वर्षी पालघरमध्ये पावसाचा पहिला बळी गेल्यानंतर बोईसरमधील नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. एमआयडीसी बांधकाम विभागाविरोधात स्थानिक आक्रमक झाले. एमआयडीसी बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला.


रायगडमध्येही पावसाचा हाहा:कार


आज रायगडात मुसळधार पाऊस कोसळला आहे. काही भागात ढगफुटी झाल्यामुळे अनेक नद्या तुडुंब भरून वाहताना दिसत आहेत. किल्ले रायगडावर देखील ढगफुटीसदृश पाऊस झाला. किल्ले रायगडावरील महादरवाजातून पाण्याचा लोंढा वाहत आहे. मुख्य दरवाजातून पाण्याचं रौद्र रुप पाहायला मिळतंय, यातच रायगडावर पर्यटनासाठी आलेले शिवभक्त थोडक्यात बचावले आहेत.  किल्ल्याच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरुप आलं आहे, त्यामुळे यावरुन खाली उतरणं देखील कठीण झालं आहे.


रायगडावर पावसाचं रौद्ररुप, पर्यटक अडकले


आज अनेक पर्यटक रायगडावर गेले असतानाच मुख्य पायऱ्यांवरील काही भागात मोठ-मोठे धबधब्यांसारखे पाण्याचे लोंढे वाहू लागले, त्यामुळे येथील अडकलेले पर्यटक आपला जीव धोक्यात घालून या पायऱ्यांवरील वाट काढत मार्ग काढू लागले. आता कसेतरी हे पर्यटक पावसाच्या कचाट्यातून सुखरुप बाहेर पडले आहेत. मुसळधार पावसात गडकिल्ल्यांवर चढण्याचं धाडस करू नये, असं आवाहन सध्या करण्यात येत आहे.


रायगडाकडील सर्व मार्ग बॅरीकेटिंग टाकून बंद 


रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग टाकून  बंद करण्यात आला आहे. रायगड किल्ले परिसरात पोलीस  बंदोबस्त नेमण्यात आला आहे, तसेच सद्यस्थितीत किल्ले रायगडावर असलेल्या पर्यटकांना रोपवे ने गडावरुन उतरवण्यात येत आहे. यानंतर रोप वे देखील प्रशासनाकडून बंद करण्यात येणार आहे.


हेही वाचा:


मोठी बातमी: पाण्याच्या लोंढ्यात एकजण वाहून गेला; किल्ले रायगडाचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद