Palghar News : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काल (बुधवारी) राज्यभरात सामूहिक 'जन गन मन अभियान' राबविण्यात आलं. पालघर जिल्ह्यातही या अभियानाला उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. मात्र पालघर तालुक्यातील चहाडे येथील एका कुटुंबानं आपल्यावर कोसळलेलं दु:ख बाजूला सारुन राष्ट्राला प्रथम प्राधान्य दिल्याचं अनोखं चित्र पहायला मिळालं. 


चहाडे येथील रहिवासी गजानन काशिनाथ पाटील यांच्या पत्नी सुमित्रा पाटील यांचे गेल्या शुक्रवारी निधन झालं. त्यांच्या निधनाला आठवडाही उलटला नसताना स्वाती (बंटी) नरोत्तम पाटील (35) या गजानन पाटील यांच्या नातीचेही अचानक निधन झालं. एकाच घरात असे दुःखाचे दुहेरी संकट आल्यामुळे पाटील कुटूंबियांना उत्तरकार्याबाबत योग्य निर्णय घेता आला नाही. त्यांनी दोघींचेही उत्तरकार्य आज, बुधवारी चहाडे येथे राहत्या घरी आणि सूर्यानदीच्या मासवण बंधार्‍यावर ठेवलं होतं. 


दरम्यान, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य सप्ताह अंतर्गत राष्ट्रप्रेम जागृत व्हावं, ते देशवासीयांत वृद्धींगत व्हावं या उद्देशानं राज्य सरकारनं काल (बुधवारी) सकाळी 11 वाजता सामूहिक जन गन मन अभियान राबविलं. नेमक्या याच वेळेत सूर्यानदीच्या तीरी मासवण बंधार्‍यावर पाटील कुटूंबियांकडून उत्तरकार्याची विधी सुरू होती. विशेष म्हणजे, पाटील कुटूंबियांनी ते थांबऊन सुख आणि दुःख आपलंच समजून उत्तरकार्याला क्षणभर विश्रांती दिली आणि प्रथम प्राधान्य राष्ट्राला दिले. यावेळी तेथे उपस्थित सर्वांनी वेळेत राष्ट्रगीत घेतले आणि नंतर उत्तरकार्य पूर्ण केले. पाटील कुटूंबियांवर दु:खाचे डोंगर कोसळले असताना त्यांनी आपल्या राष्ट्राप्रती दाखवलेल्या आदराबद्दल पालघर जिल्ह्यासह राज्यभर त्यांचे कौतूक होत आहे.


यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं देशात 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव' (Azadi Ka Amrit Mahotsav) सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या 'स्वराज्य महोत्सवाचे' आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही संकल्पना राबवण्यात आली. काल सकाळी 11 वाजता राज्यात सामूहिकपणे राष्ट्रगीताचं गायन झालं. या राष्ट्रगीताच्या समूह गायनामध्ये राज्यातील सर्व अबाल-वृद्धांनी सहभाग घेतला. हा उपक्रम राज्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, प्रशासनानं याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी, असेही निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. दरम्यान, सरकारनं सर्व विभाग, विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठी सामूहिक राष्ट्रगीत गायन अनिवार्य केलं होतं. राष्ट्रगीतासाठी विद्यार्थ्यांना मोकळ्या मैदानात एकत्र येण्यास सांगण्यात आलं होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :