पालघर - शिवसेना शिंदे गटाचे डहाणू तालुका विधानसभा संघटक अशोक धोडी हे मागील 11 दिवसांपासून बेपत्ता आहेत. एक राजकीय पदाधिकारी बेपत्ता होऊन इतके दिवस उलटले, तरीही पोलिसांना अद्याप धोडी यांचा शोध घेण्यात यश आलं नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे धोडी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अजूनही पोलिसांना बेपत्ता असलेल्या अशोक धोडी यांच्याबद्दल फारशी माहिती मिळाली नाही. (Ashok Dhodi)अपहरणाच्या घटनेला 11 दिवस उलटून गेल्याने आणि धोडी यांचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने धोडी यांच्यासोबत घातपात घडला असावा, असा संशय आता सर्वच थरातून आणि पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. 20 जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास धोडी यांचं अपहरण करण्यात आलं होतं. यानंतर त्यांची गाडी गुजरातच्या दिशेनं गेल्याचं एका सीसीटीव्ही दिसून आलं होतं. पण त्यानंतर पोलिसांना धोडी यांच्या गाडीचा माग घेता आलेला नाहीये.


पोलिसांना आतापर्यंतच्या तपासात काय सापडले?


मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी 20 जानेवारीला अशोक धोडी यांनी आपल्या पत्नीला फोन केला होता. आपण डहाणूवरून घरी येत असल्याचं त्यांनी पत्नीला सांगितलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. आता अकरा दिवसानंतरही त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नाहीये. पाच आरोपींनी धोडी यांचं अपहरण केल्याचा संशय पोलिसांना आहे. हे पाचही आरोपी फरार असून यातील दोन आरोपी हे राजस्थानला पळून गेल्याची माहिती समोर येत आहे. तर ज्या चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यांना आता अटक करण्यात आले आहे. डहाणूहून निघाल्यानंतर धोडी यांची गाडी रस्त्यातील एका घाटामध्ये अडवण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितलं त्या ठिकाणी गाडीच्या काचेचे अवशेष त्याचबरोबर काही खाणाखुणा सापडल्या आहेत. याप्रकरणी अशोक धोडी यांच्या ब्रिझाकारसह एक आयशर टेम्पो आणि एका पिकपचाही वापर झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाले.


घातपाताचा संशय, पाच जण ताब्यात


तर पहिल्या ठिकाणी जेथे हल्ला करण्यात आला त्यानंतर त्यांनी अशोक धोडी यांना वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या आरोपींच्या स्वाधीन केल्याचा संशय ही पोलिसांकडून व्यक्त केला जात असून जे फरार आहेत त्यांच्याकडूनच या प्रकरणाचा माघमुस लागू शकतो अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे जी तपास पथक परराज्यात तपासासाठी रवाना झाले आहेत. त्यांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतरच ह्याचा पूर्ण छडा लागेल असं पोलिसांचं म्हणणं आहे. तशा दिशेने हा तपास सुरू करण्यात आला आहे. तर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं होतं त्यानंतर संशयित अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी पोलीस चौकीतून पळून गेला तो अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही. अशोक धोडी हे परराज्यातून होणाऱ्या दारू तस्करीत अडचण ठरत होते. याच कारणातून त्यांचं अपहरण करून त्यांच्यासोबत घातपात केल्याचा संशय पोलिसांना आहे. दारू तस्करीतून संशयित आरोपींनी कोट्यावधींची माया जमवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. 


पालघर पोलिसांची आठ पथकं शोधासाठी तैनात


सध्या पालघर पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सहाय्याने आठ पथक तयार केले असून ती वेगवेगळ्या भागात या प्रकरणाचा शोध घेत आहेत. आत्तापर्यंत तलासरी तालुक्यातील अनेक दगड खाणी आणि इतर ठिकाण त्यांच्याकडून तपासून झाले असून काही भाग अजूनही तपासायचा असल्याचा पोलिसांनी सांगितलं आहे. जे चार आरोपी अटक करण्यात आले आहेत त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आपला तपास अर्ध्यावर नेऊन ठेवला आहे मात्र अशोक धोडींचं पुढे काय झालं ते कुठे आहेत त्यांची गाडी  कुठे आहे. याचा थांगपत्ता अजूनही लागत नाही. त्यामुळे जोपर्यंत राजस्थानच्या दिशेने फरार झालेले संशयित तसेच चौकीतून फरार झालेला अविनाश धोडी पोलिसांच्या हाती लागत नाही तोपर्यंत पूर्ण तपास होणे कठीण झालं असून पालघर चे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पालघर पोलीस  आरोपींचा शोध घेत आहेत.


हेही वाचा:


Palghar : पालघर शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरण, चौकशीसाठी आलेला संशयित पोलिस ठाण्यातून फरार