पालघर: वांद्री प्रकल्पातून कालव्यांची दुरुस्ती न करताच शेतीसाठी पाणी सोडल्याने पालघर पूर्वेस असलेल्या 18 ते 19 गावांमधील शेकडो हेक्टरवरील रब्बी पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतीत गेलेल्या पाण्यामुळे मूग, वाल, वटाणे, तीळ ही पीकं नष्ट झाली आहेत. 


पालघरच्या पूर्वेस असलेल्या अनेक गावांमध्ये दुबार शेतीसाठी वांद्री प्रकल्पातून कालव्यांमार्फत पाणी सोडलं जातं. मात्र या कालव्यांची अर्धवट दुरुस्ती करून शेतीसाठी पाणी सोडल्याने कालव्यांमधील पाणी थेट रब्बी पिकांमध्ये गेलं आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी आज या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून यावेळी त्यांनी पाटबंधारे विभागाच्या भ्रष्टाचाराविरोधात लवकरच आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे. 


पालघरच्या पूर्व भागात असलेल्या कुडे, नावझे, दहिसरसह परिसरातील 18 ते 19 गावांमध्ये दुबार शेतीसाठी वांद्री प्रकल्पातून कालव्यांमार्फत पाणी सोडलं जातं. मात्र याच भागात रब्बी पिकाचंही मोठं उत्पादन घेतलं जात असल्याने कालव्यांची दुरुस्ती करूनच पाणी सोडण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत पाठबंधारे विभागाने पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे.  झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली जावी अशी मागणी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.


खासदार राजेंद्र गावित यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर 


बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित हे घडलेल्या प्रकारावरुन चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. वांद्री धरणाच्या कालव्यांमधून निघालेल्या पाण्यामुळे पालघर पूर्वेस असलेल्या शेकडो हेक्टरवरील रब्बी पिकाचं नुकसान झालं असून याची प्रत्यक्ष पाहणी करून खासदार गावित यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. कमी दरात काम भरून निकृष्ट दर्जाची काम होत असतानाही अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याच सांगत निकृष्ट दर्जाची काम होत असताना तुम्ही अधिकारी या ठेकेदारांना काळ्या यादीत का टाकत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच तुम्ही ठेकेदारांवर कारवाई करत नसाल तर मला तुमच्यावर कारवाई करावी लागेल असा इशाराही गावित यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला.


ही बातमी वाचा: