पालघर: देशाची सध्या डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना (School) आपला जीव धोक्यात टाकून शिक्षणासाठी शाळेपर्यंत पोहचावं लागतंय. पालघर (Palghar) जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील सोनाळे रायकर पाडा आणि गारगाव नाकाडपाडा ते जुगरे पाडा येथून पाण्याच्या धोकादायक प्रवाहातून प्रवास करत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्रास एबीपी माझाने वृत्ताच्या माध्यमातून शासनाला दाखवला. त्यानंतर, सरकारने डोळे उघडले असून विद्यार्थ्यांचे वास्तव दाखवल्यानंतरच प्रशासनाला जाग आली आहे. त्यानुसार, आजपासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. 

शासनाने एबीपी माझाच्या बातमीची दखल घेत  या दोन्ही पाड्यांवरील जवळपास 25 विद्यार्थ्यांची आश्रमशाळेत निवासी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच, तातडीने येथील चांगल्या दळणवळणाची सुविधा देखील करणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्राद्वारे कळवलं आहे. 

वाडाच्या तहसिलदारांनी जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना याबाबत पत्र लिहिले आहे. त्यानुसार, मौजे रायकरपाडा ते सोनाळे येथील न्यू इंग्लीश स्कूल सोनाळे आणि जि.प.शाळा कापरी येथील विद्यार्थ्यांच्या शाळेत येण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासाबाबतच्या उपरोक्त संदर्भिय विषयान्वये कळविण्यात येते की, वाडा तालुक्यातील मौजे गारगाव नाकाडपाडा-झुगरेपाडा येथे गारगाई नदीच्या बंधाऱ्यावरुन शाळेत जाण्यासाठी मुलांना कराव्या लागणाऱ्या प्रवासाबाबत प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेल्या वृत्ताच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व मंडळ अधिकारी मांडवा यांनो प्रत्यक्ष बंधारा तसेच शाळेस व गावी 3 जुलै रोजी भेट दिलेली आहे. तसेच मौजे रायकरपाडा ते सोनाळे येथील न्यू इंग्लिश स्कूल सोनाळे व जि.प. शाळा कापरी येथील विद्यार्थ्यांच्या शाळेत येण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासाबाबत प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेल्या वृत्ताच्या अनुषंगाने मंडळ अधिकारी कोने यांनी प्रत्यक्ष भेट दिलेली आहे.

पालकांच्या परवानगीने आश्रमशाळेत सोय

गारगाव आश्रमशाळा व जि.प.शाळा मधील विद्यार्थी मौजे गारगाव येथील नाकाडपाडा-झुगरेपाडा येथील गारगाई नदीवरील धाकेदाचा बंधाऱ्यावरुन पाणी वाहत असताना ये-जा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गारगाव आश्रमशाळेतील 17 विद्यार्थी व जि.प.शाळेतील 8 विद्यार्थी अशा एकूण 25 विद्यार्थ्यांची गारगाव आश्रमशाळा येथे निवासी व्यवस्था करणेबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच रायकरपाडा येथील 7 विद्यार्थ्यांनीसाठी कळंबे येथील आश्रमशाळा व 7 विद्यार्थ्यांसाठी सोनाळे हायस्कूल वसतीगृह येथे अशी एकूण 14 विद्यार्थ्यांसाठी पालकांच्या संमतीने माहे ऑक्टोबरपर्यंत निवासी व्यवस्था गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती वाडा व संबंधित मुख्याध्यापक यांचेमार्फत कार्यवाही करण्यात येत आहे, असे या पत्रात म्हटलं आहे. 

हेही वाचा

एकनाथ शिंदेंची वारी, शिवाजी चौक ते मंदिर चालत घेतले विठुरायाचे दर्शन; बुलेटवरुन पंढरीच्या यात्रेची पाहणी