पालघर : मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने (Rain) धुमाकूळ घातल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत वाहतूक व्यवस्थेवर पावसाचा, मुंबईतील पाण्याचा परिणाम झाला असून अनेक ट्रेन्स रद्द झाल्या आहेत. तर, लोकल सेवाही ठप्प झाल्याचं दिसून आलं, प्रवाशांची, चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली. पावसाच्या या संकटात अनेकांनी संधी शोधली तर काहींनी संकटात देवदूत बनून माणुसकी जपली. काहींनी खोळंबलेल्या प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भाडे घेऊन डल्ला मारला. तर, काहींनी प्रवासात अडकेल्यांना मोफत जेवण, पाणी देत सेवाभाव जपला. वसई-विरारमधूनही (Vasai) अशाच एका कर्तव्यदक्ष डॉक्टरांची (Doctor) माणुसकी पाहायला मिळाली. भरपावसात आपली बीएमडल्बू काढत डॉ. पिल्ले यांनी 90 वर्षांच्या वृद्ध रुग्णासाठी रुग्णालयात धाव घेतली. 

Continues below advertisement

मुंबईसह पालघर जिल्ह्यातही पावसाने हाहाकार माजला असून जिकडे तिकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. अनेक नद्या, नाले, जलाशयांनी धोक्याची पातळी ओलांडली असून रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. वसई-विरार शहरातही पावसाने अक्षरशः थैमान घातलं होतं. महामार्ग, रेल्वेमार्ग आणि शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने दुचाकी देखील घराबाहेर काढायचा त्रास नागरिकांनी घेतला नाही. याशिवाय, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून चाकरमान्यांनीही ऑफिसला दांडी मारली. मात्र, या कोसळणाऱ्या पावसात एक डॉक्टरांने आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत रुग्णसेवेचा धर्म पाळला. 

वसईतील कार्डिनल हॉस्पिटलचे डॉ. संतोष पिल्ले यांच्याकडे 90 वर्षीय रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. मात्र, आज अचानक त्यांची प्रकृती गंभीर झाल्याचा फोन डॉक्टर पिल्ले यांना आला. पिल्ले हे घरी होते, बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता आणि रुग्ण लांब रुग्णालयात दाखल होता. मात्र, फोनवरून उपचार करणे शक्य नव्हते, पण रुग्णाचा जीव धोक्यात असल्याची परिस्थिती लक्षात येताच डॉ. पिल्ले यांनी क्षणाचाही विलंब न करता आपली नवी बीएमडब्ल्यू कार बाहेर काढली, पडत्या पावसात आणि रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत त्यांनी अखेर रुग्णालय गाठलं. त्यानंतर, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वृद्ध रुग्णावर उपचार करत त्यांचा जीव वाचवला. त्यानंतर, ते पुन्हा घरी परतण्यासाठी निघाले असता पावसाच्या पाण्यात त्यांची कार बंद पडलीय. 

Continues below advertisement

रुग्णावरील उपचाराचे समाधान चेहऱ्यावर घेऊन डॉ. संतोष पिल्ले घरी परततत असताना वसई रेल्वे ब्रिजखाली त्यांच्या बीएमडब्ल्यू कारला पाण्याचा फटका बसला. कार रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने डॉक्टर अडकून पडले, दरम्यान टोईंग व्हॅनची जवळपास एक तास प्रतीक्षा केल्यानंतर त्यांचा पावसाच्या पाण्यातून घरी जाण्याचा मार्ग सुकर झाला. पण, ''मी एका रुग्णाचा जीव वाचवू शकलो, यापेक्षा मोठा आनंद डॉक्टरांच्या आयुष्यात दुसरा नसतो'' अशी भावनिक आणि सेवाभावी प्रतिक्रिया त्यांनी दिली. एकीकडे वैद्यकीय क्षेत्रावर आणि डॉक्टरांवर सातत्याने संशयाच्या भोवऱ्यातून पाहिलं जात आहे, रुग्णसेवेपेक्षा रुग्णांची लूट करणारे म्हणून डॉक्टरांची प्रतिमा मलिन होत आहे. मात्र, दुसरीकडे सेवाधर्म आणि रुग्णासाठी ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगणाऱ्या अशा डॉक्टरांमुळेच रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या चेहऱ्यावर खरा 'संतोष' दिसतो. त्यामुळेच, डॉ. संतोष हेच आजचे मॅन ऑफ रेन किंवा तेच आजचे खरे हिरो ठरले, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

हेही वाचा

महाराष्ट्रात पावसाचं तुफान; राज्यभरात 16 जणांचा मृत्यू; मराठवाड्यात नद्यांना पूर, शेतात पाणी, मुंबईत रेल्वे, लोकल विस्कळीत