मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना (Jalna) येथील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचे पडसाद मराठवाड्यासह राज्यभरात उमटले. जालन्यात सायंकाळच्या सुमारास लाठीमार झाल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली. मराठा आरक्षण आंदोलनावर झालेल्या लाठीमारानंतर उसळलेल्या हिंसक प्रतिक्रियेची धग एसटी महामंडळाला बसली आहे. काही ठिकाणी एसटी बसेस जाळण्यात आल्यात. तर, काही मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली. त्याच्या परिणामी एसटी महामंडळाला (msrtc ST Bus) आर्थिक फटका बसला आहे. 


आधीच आर्थिक संकटात असणाऱ्या एसटी महामंडळाला आंदोलनाच्या हिंसक प्रतिक्रियेचा फटक बसला आहे. जालन्यातील लाठीमाराची बातमी वेगाने पसरू लागल्यानंतर जालना आणि परिसरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाले. खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळाने आपली वाहतूक बंद ठेवली. अनेक ठिकाणी आंदोलकांनी एसटीला लक्ष्य केल्याने महामंडळाला फटका बसला.  


एसटीचे नुकसान किती?


मराठा आरक्षण आंदोलनामुळे गेल्या तीन दिवसात एसटीच्या 250 आगारांपैकी 46 आगारातील वाहतूक पूर्णतः बंद आहेत. यामध्ये प्रामुख्याने अहमदनगर, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात बंदचा मोठा प्रभाव दिसून आला आहे याच जिल्ह्यातील बहुतांशी एसटी आगार बंद आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये आंदोलनात एसटी बसेसना आग लावण्याची घटना घडली. यामध्ये एसटीच्या 20 बसेस पूर्णत: जळालेल्या आहेत. तर,  19 एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली. यामुळे एसटीचे सुमारे 5 कोटी 25 लाखाचे नुकसान झाले आहे.


गेल्या तीन दिवसात बंद असलेल्या आगारामुळे आणि इतर आगारातील अंशतः रद्द केलेल्या फेऱ्यामुळे एसटी महामंडळाच्या तिकीट उत्पन्नापैकी सुमारे 8 कोटी रुपयाचे उत्पन्न बुडाले आहे. सोमवारी, संध्याकाळ 4 वाजेपर्यंत एसटीच्या एकूण बस फेऱ्यांपैकी सुमारे 6200 फेऱ्या जिल्हा बंद आंदोलनामुळे रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आज दिवसभर सुमारे दोन कोटी 60 लाख रुपये महसूल बुडाला आहे.


जालना जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 181 जणांवर गुन्हे दाखल


जालना येथील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचे पडसाद उमटले आहेत. आतापर्यंत जालना जिल्ह्यात 3 हजार 181 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, 33 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.  जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मोठ-मोठाले दगड, लाकडे टाकून, वाहनांची जाळपोळ करून सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी कलम 353, 332, 336, 337, 341, 435, 144, 143, 145, 146, 147, 148, 149, 109, 114 भादंविसह कलम 135 मु. पो. कायदा, सहकलम -3 व 4 सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा, सहकलम 7 क्रिमिनल लॉ अमेन्टमेन्ट अॅक्टप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या: