New Delhi Murder Case : दिल्लीतील गीता कॉलनीतील उड्डाणपुलाजवळ एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. महिलेचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले होते. बुधवारी (12 जुलै) सकाळी पोलिसांना याची माहिती मिळाली, यानंतर पोलिसांनी घटनास्थळी हजर होत तपास सुरु केला. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाच्या (Shraddha Walkar Murder Case) आठवणी ताज्या झाल्या आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 9.15 वाजताच्या सुमारास त्यांना गीता कॉलनी उड्डाणपुलाजवळ (Geeta Colony Flyover) काही मानवी शरीराचे तुकडे पडल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह फॉरेन्सिक टीम देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. या महिलेच्या शरीराचे अवयव आजूबाजूला विखुरलेले होते. या घटनेमुळे पुन्हा एकदा दिल्ली हादरली आहे.


घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त 


गीता कॉलनीतील उड्डाणपुलाजवळील परिसरात नाकाबंदी लावून शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून आसपास तरुणीच्या शरीराचे आणखी काही तुकडे मिळतात का, याची पाहणी पोलीस करत आहेत. हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र किंवा काही पुरावे आढळतात का, याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.


महिलेचं वय 35 ते 40 वर्षं असल्याचा अंदाज


डीसीपी सागर सिंह कलसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे दिल्लीतील गीता कॉलनीजवळ सापडले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, महिलेचं वय 35 ते 40 वर्षं असावं असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अधिक तपासासाठी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला बोलावण्यात आलं आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दोन पिशव्यांमध्ये आढळला मृतदेह


दिल्लीचे जॉईट सीपी परमादित्य यांनी सांगितल्याप्रमाणे, गीता कॉलनी उड्डाणपुलाखाली सापडलेला मृतदेह हा दोन बॅगमध्ये आढळून आला, मृतदेहाचे काही अवयव पिशवीबाहेर पडले होते. एका पिशवीमध्ये डोकं आणि दुसऱ्या पिशवीत शरीराचे इतर अवयव आहेत. लांब केसांवरुन हा मृतदेह तरुणीचा अथवा महिलेचा असल्याचं ते म्हणाले. हा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आल्याची माहिती देखील सीपी परमादित्य यांनी दिली.


दिल्लीत गेल्या काही महिन्यांपासून हत्यासत्र सुरुच


दरम्यान, मागच्या आठवड्यात देखील दिल्ली पोलिसांना सफदरजंग हॉस्पिटलच्या मागील जंगलात कुजलेला मृतदेह मिळाला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी देखील पाठवला. मात्र हा मृतदेह महिलेचा आहे की पुरुषाचा? हे अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांनी याप्रकरणात देखील गुन्हा दाखल केला. परंतु मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न अद्याप सुरुच आहेत. हा मृतदेह सुमारे 15 दिवसांचा असल्याचं सांगण्यात आलं.


एका पाठोपाठ एक भयंकर खून दिल्लीत का होत आहेत?


दिल्ली महिला आयोग अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या घटनेनंतर ट्विटरवरुन प्रश्न उपस्थित केला आहे. दिल्लीच्या गीता कॉलनीत महिलेच्या मृतदेहाचे अनेक तुकडे सापडले, या संदर्भात पोलिसांना नोटीस पाठवत असल्याचं त्या म्हणाल्या. तर ही महिला कोण होती? आरोपींना अटक कधी होणार? एका पाठोपाठ एक भयंकर खूनाचे प्रकार दिल्लीत का होत आहेत? दिल्लीतील कायदा व्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त होत आहे का? असे अनेक प्रश्न दिल्लीच्या महिला आयोग अध्यक्षांनी उपस्थित केले आहेत.


हेही वाचा:


Samrudhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा ट्रॅव्हल्सचा अपघात, बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा