Maharashtra Politics Palghar Shivsena : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे 40 आमदारांनंतर आता स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य शिंदे गटात सामिल होत आहेत. शुक्रवारी रात्री, पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला. यावेळी पालघरचे खासदार राजेंद्र गावित आणि आमदार श्रीनिवास वनगादेखील उपस्थित होते. शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे समजले जात आहे. 


एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून पालघर जिल्ह्यातील बहुसंख्य शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये काही दिवस चलबिचल सुरू होती. त्यानंतर शुक्रवारी त्री शिवसेनेतील  अनेक नेते कार्यकर्ते एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी मुंबईतील आनंदवन बंगल्यावर दाखल झाले होते. मागच्या अनेक दिवसांपासून शिंदे गटात जोरदार भरती सुरु आहे. बंड केलेले आमदार आपले शक्ती प्रदर्शन प्रत्येक जिल्ह्यात करीत आहेत. त्यामुळे शिवसेनेसाठी ही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.


शिंदे गटात कोण झाले सामिल?


आमदार श्रीनिवास यांच्या सोबत काल रात्री उशिरा पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित , पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, सारिका निकम, मोखाडा तालुका प्रमुख अमोल पाटील यासह जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी नगरपरिषदचे सर्व नगरसेवक, पालघर जिल्हा परिषदेचे सहा सदस्य, जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते, वसई तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, वसई तालुका उपप्रमुख तथा माजी नगरसेविका यांचे पती दिवाकर सिंग, काही महिन्यांपूर्वी बहुजन विकास आघाडीतून शिवसेनेत दाखल झालेले वसई-विरारचे माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांच्यासह जवळपास 50 ते 60 शिवसेना पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सामिल झाले आहेत.


जिजाऊ संघटनाही शिंदे गटासोबत


पालघर जिल्ह्यातील जिजाऊ संघटनाही शिंदे गटासोबत असल्याचे दिसून आले. या वर्षी जिजाऊ संघटनेने विक्रमगड, तलासरीसह इतर तालुक्यात निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना चांगले यश  मिळाले होते. जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे आणि पदाधिकारी शिंदे गटात सामिल झाले आहेत.