Maharashtra Politics Shivsena :  शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी अभूतपूर्व बंड केल्यानंतर पक्षाला पु्न्हा उभारण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वीच पालघरमध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली. पालघर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात सामिल होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता शिवसेनेने पक्ष उभारण्यासाठी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या काळातील शिवसैनिकांवर जबाबदारी दिली आहे. शिवसेनेने पालघर जिल्ह्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. 


पालघरमध्ये शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर नव्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. दिवंगत शिवसेना नेते आणि ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या काळातील जुन्या शिवसैनिकांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. उदय बंधू पाटील यांची उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, एकनाथ शिंदे यांचे विरोधक समजले जाणारे माजी जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांची पालघर, भिवंडी आणि ठाणे लोकसभा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रमगड विधानसभा जिल्हा प्रमुखपदी वैभव संखे , डहाणू-बोईसर विधानसभा जिल्हाप्रमुखपदी वसंत चव्हाण आणि वसई-नालासोपारा जिल्हाप्रमुखपदी पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील आमदार, नगरसेवक, सभापती शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. 


जुन्यांवर पुन्हा विश्वास


एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्हा प्रमुख असताना त्यांचा पालघर जिल्ह्यातील भागांवर प्रभाव होता. शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी ठाणे, पालघरमधून मोठी पाठिंबा मिळण्याची शक्यता शिवसेना नेत्यांनी गृहीत धरली होती. बंड चिघळल्यानंतर शिवसेना वाचवण्यासाठी अनेक जु्ने शिवसैनिक सक्रिय झाले आहेत. ठाण्यातही आनंद दिघे यांचे सहकारी राहिलेले खासदार राजन विचारे हे सध्या तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. ठाण्यातील 67 पैकी 66 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर, शिंदे यांच्यासोबत न जाणाऱ्या एकमेव नगरसेविका या राजन विचारे यांच्या पत्नी आहेत. ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून राजन विचारे यांना जबाबदारी दिली जाऊ शकते. तर, दुसरीकडे आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघेदेखील सक्रिय झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी केदार दिघे यांचे पक्षात पंख छाटले होते. त्यामुळे केदार दिघे हे काही काळ पक्ष कार्यापासून दूर होते, अशी चर्चा सुरू होती. त्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेलेदेखील पु्न्हा शिवसेनेत सक्रिय होत आहेत. शिवसेना नेतृत्वाकडून या जुन्हा शिवसैनिकांना संधी दिली जात आहे.