Palghar News: डहाणू (Dahanu) तालुक्यातील चिंचणीजवळ असलेल्या बावडा गावात बिबट्याची (Leopard) दहशत पसरली आहे. परिसरात बिबट्याचा वावर सुरू असल्याने गावातील नागरिक भीतीच्या सावटाखाली राहत आहेत. बोईसर वनपरीक्षेत्र विभागाने बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले असून गावकर्‍यांनी घाबरून न जाण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.


बावडा गावातील कणीक पाडा आणि धोडी पाड्यातील नागरीकांना तीन-चार दिवसांपासून रोज एका बिबट्याचं दर्शन होत आहे. कौशल संतोष मराठे आणि अक्षय सालकर हे दोन तरुण पाड्याजवळच असलेल्या शेतात आपल्या शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेले असताना रविवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास बिबट्याने अचानक कौशल मराठे या तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कौशलने आरडाओरड करत मोठ्या शिताफीने बिबट्याचा हल्ला परतावून लावल्यावर बिबट्या बाजूच्या चिकूच्या वाडीत पसार झाला. या झटापटीत कौशल मराठे या तरुणाच्या हाताला किरकोळ खरचटलं आहे.


गेले दोन ते तीन दिवस रोज रात्रीच्या सुमारास बिबट्या कणीक पाड्यातील नागरीकांच्या घराबाहेरील कोंबड्या आणि मांजरं पळवून फस्त करत असल्याच्या घटना घडत आहेत. पाड्यातील नागरीकांना आतापर्यंत दोन ते तीन वेळा हा बिबट्या नजरेस पडला आहे. तर काही ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे देखील आढळून आले आहेत.


बिबट्याच्या भीतीमुळे बावडा गावातील प्राथमिक शाळा बंद ठेवण्याची वेळ आली असून नागरीक शेतात जाण्यास देखील घाबरत आहेत. गावकर्‍यांच्या तक्रारीनंतर बोईसर वनपरीक्षेत्र अधिकारी अपेक्षा साटम आणि वन कर्मचार्‍यांनी कणीक पाडा येथे भेट देऊन तेथील नागरिक आणि महिलांशी संवाद साधत त्यांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे.


वाणगाव पोलिसांनी देखील या भागात गस्त वाढवली आहे. तसेच रात्रीच्या सुमारास लहान मुलं आणि एकट्या-दुकट्याने घराबाहेर न पडण्याची खबरदारी घेण्यास सांगितलं आहे. बिबट्याचा माग काढण्यासाठी कणीक पाड्यात वेगवेगळ्या मार्गावर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून गावकर्‍यांच्या सुरक्षेसाठी रात्रीच्या वेळेस एका वन कर्मचार्‍याची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. बिबट्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी गावकर्‍यांनी वनविभागाकडे केली आहे.


बावडा गावच्या परीसरात बिबट्याचं अस्तित्त्व आढळून आल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. रात्रीच्या सुमारास लहान मुलांना घराबाहेर पाठवू नये आणि एकट्याने बाहेर पडू नये, असं आवाहन वनविभागाकडून करण्यात आलं आहे.


हेही वाचा:


Nashik Crime : गड किल्ल्यावर दारू पिणाऱ्यांची आता खैर नाही, सहा महिने शिक्षा, दहा हजारांचा दंड, कुणी घेतला निर्णय?