पालघर : पालघर लोकसभेच्या निवडणूक रणसंग्रामास आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. पालघरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. बहुजन विकास आघाडीने (Bahujan Vikas Aghadi) ही प्रचारास सुरुवात केली आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी मतदारसंगात चौक सभा घेण्यावर भर दिला आहे. नुकतंच आजारपणातून बरे झालेले हितेंद्र ठाकूर आता मतदारसंघात चौकाचौकात नागरीकांशी संवाद साधताना दिसत आहेत. त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेत आहे. सईच्या तुंगारफाटा येथील शनी मंदिराच्या प्रागंणात चौक सभा पार पडली.


विरोधी आमदार माझ्या मुलासारखे : हितेंद्र ठाकूर


विरोधी आमदार माझ्या मुलासारखे आहेत, ते नाईलाजस्तव आपल्या पक्षात काम करतायत, ते तेथे पोष्टर बॉईज आहेत, ते मनापासून माझे काम करतायत, असा गौप्यस्फोट हितेंद्र ठाकूरांनी मोठा केला आहे. बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी संवाद साधला आहे. यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी हे वक्तव्य केलं आहे. आपल्या उमेदवाराकरता फिरतोय. भाषणं ठोकून पळणं मला जमतं नाही. मी नागरीकांशी संवाद साधतो, थेट बोलतो, त्यांचे प्रश्न ऐकतो, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.


विरोधी आमदार पक्षात पोस्टर बॉयज, पण मनापासून माझं काम करतात


पालघरमध्ये एक कम्युनिष्ट पक्षाचा आमदार तर दुसरा राष्ट्रवादीचा आमदार आहे, दोन्ही मला मुलासारखे आणि दोन्ही आमचे उमेदवार राजेश पाटील यांचे मित्र आहेत. ते नाईलाजस्तव काम करतायत. त्यांच्या पक्षात फक्त ते पोष्टर बॉय आहेत. ते मनापासून माझे काम करतायत, असा गौप्यस्फोट डहाणू विधानसभेचे कम्युनिष्ठ पक्षाचे आमदार आणि विक्रमगडचे राष्ट्रवादीचे आमदार यांच्याबद्दल हितेंद्र ठाकूरांनी केला आहे. 


भुलथापांना बळी पडल्याने बळीराम जाधव पडले


पाण्याचा प्रश्न सुटलाय. पाईपलाईन टाकण्याचं काम सुरु आहे. पालघरसाठीचे मोठे प्रकल्प जे केंद्रातून होत असतात, आपले माजी खासदार बळीराम जाधव यांनी केंद्रातून विविध योजनेतून पालघरसाठी साडेतीन हजार कोटी एवढा निधी आणला. दुर्दैवाने मागील 10 वर्षात एका लाटेत किंवा भुलथापांना बळी पडून आपले खासदार पडले किंवा पाडले गेले. आता लोकांना माहित पडले आहे, आता लाट राहिली नाही. पाईप गॅस आणण्याचं काम आमच्या खासदारांनी केलं आहे. विद्यमान खासदारांनी पालघरसाठी काही केलं नाही, असं म्हणत हितेंद्र ठाकूर यांनी जोरदार निशाणा साधला आहे.


मी भाजपा विरोधात लढतोय, ठाकरे गटाचं आव्हान नाही


दोन तगडे पक्ष आपापसात लढतायत. पालघरमध्ये आम्ही एक नंबरला आहे. पालघर लोकसभेत आमचे तीन आमदार, जिल्हा परिषद सभापती, वसई विरार पालिकेत 115 पैकी 109 नगरसेवक, असंख्य ग्रामपंचायत सदस्य आहेत. माझा प्रमुख विरोधक भाजपा आहे. मी भाजपा विरोधात लढतोय, शिवसेना ठाकरे गटाचं आव्हान मला नाही. त्यांच्याकडे आहे तरी काय? तसेच भाजपाकडे तरी आहे काय? असं म्हणत त्यांनी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपावर हल्ला चढवला आहे.