बोईसर, पालघर :  गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2023) आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. याच, पार्श्वभूमीवर मूर्तीकार बाप्पाच्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवत आहेत. बोईसरच्या रुपेश कला केंद्रात सध्या गणेश मुर्तींवर शेवटचा हात फिरवला जात आहे. रुपेश कला केंद्राचे कारागीर रुपेश वझे यांची तिसरी पिढी सध्या या कला केंद्रात बाप्पांच्या मुर्ती साकारण्याचं काम करतेय. पालघर सारख्या ग्रामीण भागात भक्तांना परवडणाऱ्या मूर्ती या कला केंद्रात साकारल्या जात असून या कला केंद्रामुळे ग्रामीण भागातील कारागिरांना रोजगार उपलब्ध होत आहे. 


बाप्पांचे आगमन काही दिवसांवर आलं असून सध्या बाप्पांची मुर्ती साकारणाऱ्या कला केंद्रांमध्ये बाप्पांच्या मुर्त्यांवर शेवटची रंगरंगोटी करण्याचं काम सुरू आहे. बोईसरच्या रुपेश कला केंद्रात तयार केल्या जाणाऱ्या मुर्त्यांना मोठी मागणी असून पालघर जिल्ह्यासह गुजरातमधील वापी नवसारी त्याचप्रमाणे दादरा नगर हवेली या भागातूनही येथील गणेश मूर्तींना मोठी मागणी आहे. पेशाने कला शिक्षक असलेल्या रुपेश यांचीही तिसरी पिढी बाप्पांच्या मुर्त्या साकारण्याचं काम करते. ग्रामीण भागातील नागरिकांना परवडतील इतक्या रास्त किंमतीत या कला केंद्रात मुर्त्या तयार होत असून या कला केंद्रात तयार होणाऱ्या आकर्षक गणेश मूर्तींमुळे रुपेश कला केंद्रातील मुर्त्यांना ग्रामीण भागातून ही मोठी मागणी आहे. 


महागाईची झळ 


यंदा शाडूच्या मातीचे दर आणि वाहतूक तसेच रंगाचे भाव वधारल्याने गणेश मुर्त्यांचेही भाव वाढले आहेत. तरीही बाप्पाच्या मुर्त्यांची मागणी मोठी आहे. तर ग्राहकांच्या मागणीप्रमाणे या मुर्त्यांची प्रतिकृती येथे साकारली जात असून लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, टिटवाळ्याचा गणपती तसेच इतर अनेक आकर्षक मुर्त्यांना मोठी मागणी आहे. 


स्थानिक कारागिरांना रोजगार


रुपेश कला केंद्रात तयार होणाऱ्या बाप्पांच्या सुबक आणि आकर्षक मुर्त्यांवर बारीक रेखीव काम करणारे कारागीर हे स्थानिक भागातील तरुण आहेत. या कलाकेंद्रांमुळे या तरुणांनाही स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत आहे. त्यामुळे या कारागिरांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बारीक रंगरंगोटी,  डायमंड , आकर्षक कपडे परिधान कपडे परिधान केलेल्या मुर्त्यांना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्त्यांवर सुबक आणि रेखीव काम करण्याची जबाबदारी ही या कारागिरांवर असते . 


बाप्पांचं आगमन अवघ्या काही दिवसांवर आलं असून सध्या रुपेश कला केंद्रात अनेक आकर्षक गणेश मूर्ती तयार आहेत. मुर्त्यांवर केलेलं बारीक रेशीम काम हे अनेक भाविकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतंय.