पालघर : प्रसुतीनंतर एक दिवसाच्या बाळासह महिलेची रक्तासाठी फरफट झाल्याची घटना पालघरमध्ये घडली. इतकंच नव्हे तर रक्तासाठी तिला आणि तिच्या पतीला बरीच पायपीट करावी लागली आहे. रशिदा खातून असं या महिलेचं नाव असून ती पालघर तालुक्यातील तामसई गावात राहते. आधीच शरीरात रक्ताची असताना या महिलेला बाळासह सुमारे सात किलोमीटर पायपीट करावी लागली
रशिदा खातूनला रविवारी (19 एप्रिल) प्रसुती वेदना सुरु झाल्या. त्यामुळे तिच्या पतीने तिला एका वाहनाने मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात नेलं. तिथे तिची प्रसुती झाली. परंतु तिला रक्ताची गरज भासली. मात्र तिचा रक्तगट सहज उपलब्ध झालं नाही. परिणामी डॉक्टरांनी तिला तिथून हलवण्याचा सल्ला दिला.
कशीबशी रुग्णवाहिका उपलब्ध करुन रशिदा खातून आणि तिच्या पतीने एक दिवसाच्या बाळासह ठाण्यातील शासकीय रुग्णालय गाठलं. मात्र या रुग्णालयात तिथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी रक्ताच्या बदलात रक्त द्या असे त्यांना सांगून निघून जा असे सांगितले. हा परिसराची फारशी जाण नसल्याने एक दिवसाच्या बाळासह ही महिला आणि तिच्याने पतीने ठाण्यावरुन पालघरच्या परतीचा रस्ता पकडला.
मात्र तिथून परतत असताना कोणतेही वाहन नसल्याने बाळासह या पती-पत्नी सुमारे चार किलोमीटर पायपीट केली. पुढे पोलिसांच्या मदतीने एका रिक्षामार्फत त्यांना मनोर येथे पाठवण्यात आले. मात्र रिक्षावाल्यानेही त्यांना मनोर मस्तान नाकापर्यंतच सोडलं. लॉकडाऊनमुळे सर्व खाजगी वाहन बंद असल्याने मनोर मस्तान नाक्याहून तामसई या गावी जाण्यासाठी त्या महिलेला तीन किलोमीटर अंतर पायी कापावं लागलं.
मनोर इथे उपचार घेत असताना आर्थिक स्थिती नसतानाही रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्याकडून तीन हजार रुपये मागितले. ही तर आणखीच दुर्दैवी आणि खेदजनक घटना आहे. हे दाम्पत्य चालत आल्याचे कळाल्यानंतर नागझरी इथल्या सुमित पाटील आणि या दाम्पत्याच्या घरमालकाने रक्तासाठी पालघर येथील डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांच्याकडे मदती मागितली. या आवाहनाला प्रतिसाद देत डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांनी या मातेला आपल्या रुग्णालयात दाखल करुन घेतले. डॉक्टरांच्या आवाहनानंतर काही रक्तदात्यांनी या मातेला रक्तदान करुन तिला रक्त दिले. त्यानंतर तिची आणि बाळाची प्रकृती स्थिर आहे