Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात (Pahalgam Terror Attack) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 26 पर्यटकांची हत्या करणारे यमदूत म्हणजेच दहशतवादी अजूनही काश्मीरच्या जंगलात लपल्याचं समजतंय. सुरक्षा यंत्रणांकडून काश्मीरमध्ये हाशिम मुसाचा शोध सुरु आहे.
दहशतवादी हाशिम मुसा त्याच्या साथीदारासह काश्मीरच्या जंगलात लपला असून, सुरक्षा यंत्रणांनी त्याचा शोध सुरू केला आहे. धक्कादायक म्हणजे जंगलात रस्ते शोधण्यासाठी दहशतवाद्यांकडून इंटरनेटशिवाय वापरू शकतो अशा अॅल्पाईन क्वेस्ट मोबाईल अॅपचा वापर केला जातोय. तसंच दहशतवाद्यांकडे चिनी बनावटची अत्याधुनिक कम्युनिकेशन यंत्रणा आहे.
युरोपचे अॅप आणि चिनी बनावटची अत्याधुनिक कम्युनिकेशन यंत्रणा कशी काम करतेय?
अॅल्पाईन क्वेस्ट नावाचे हे अॅप फ्रान्सचे आहे आणि दहशतवादी नियंत्रण रेषेवर घुसखोरी करण्यासाठी त्याचा वापर करत आहेत. पण हाशिम मुसा आणि त्याचे साथीदार जम्मू आणि काश्मीरच्या जंगलातही याचा वापर करत आहेत. आयएसआयने हे अॅप दहशतवाद्यांना उपलब्ध करून दिले आहे, जे ऑफलाइन देखील काम करते. अॅल्पाईन क्वेस्ट या अॅपद्वारे ऑफलाईन लोकेशन वापरता येते. दहशतवादी आता स्थानिक लोकांवर (मार्गदर्शकांवर) कमी अवलंबून राहू इच्छितात. सुरक्षा दलांच्या मजबूत नेटवर्किंगमुळे, दहशतवादी हल्ले अंमलात आणण्यापूर्वीच ते उधळून लावले जात होते, त्यामुळे दहशतवाही आता अॅल्पाईन क्वेस्ट अॅप वापरतात. कोणत्याही ठिकाणाचे स्थान आणि दिशा जाणून घेण्यासाठी आवश्यक असलेला गुगल मॅप इंटरनेटवर चालतो. पण अशा परिस्थितीत सुरक्षा एजन्सींकडून पकडले जाण्याचा धोका असतो. मात्र अॅल्पाईन क्वेस्ट हे अॅप इंटरनेटशिवाय वापरता येते. अॅल्पाईन क्वेस्टद्वारे कोणीही सहजपणे पर्वत, जंगल आणि नदीचे मार्ग शोधू शकतो, ते देखील इंटरनेटशिवाय. दहशतवाद्यांकडे चिनी बनावटची अत्याधुनिक कम्युनिकेशन यंत्रणा देखील असल्याची माहिती मिळत आहे. चिनी बनावटची अत्याधुनिक कम्युनिकेशन यंत्रणा चीनने पाकिस्तानला दिली असावी, ती आता दहशतवाद्यांपर्यंत पोहचली आहे. जगभरातील प्रगत सैन्य युद्धक्षेत्रातून कमांड सेंटरशी संवाद साधण्यासाठी किंवा व्हिडीओ पाठवण्यासाठी या यंत्रणांचा वापर केला जातो. ही यंत्रणा देखील इंटरनेटशिवाय वापरली जाते.