Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा (Pahalgam Terror Attack) शोध घेतला जातोय. सुरक्षा यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली जात आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे. कंदाहार विमान अपहरण प्रकरणाचा (Kandahar Hijack) मास्टरमाईंड राऊफ असगरच पहलगाम हल्ल्याचाही मास्टरमाईंड असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तसेच पहलगाम हल्ल्याबाबत जैशच्या बहावलपूरच्या बालेकिल्ल्यात कट शिजल्याची माहिती समोर येत आहे.
पहलगाम हल्ल्याला गुप्तहेर यंत्रणेचं अपयश कारणीभूत असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आता हाती आलेल्या माहितीनुसार अशा हल्ल्याची कुणकुण आधीच लागली होती. तसा अलर्टही दिला होता. त्यानुसार श्रीनगरच्या जबरवान भागात मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशनही झालं. दाचिगाम, निशात आणि परिसरात हे सर्च ऑपरेशन झालं. मात्र हाती काहीच न लागल्याने 22 एप्रिलला हे सर्च ऑपरेशन थांबवलं. आणि त्याच दिवशी पहलगाम हल्ला झाला.
कटरा-श्रीनगर रेल्वे सोहळा दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होता-
खरंतर कटरा - श्रीनगर रेल्वे सोहळा दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होता अशी माहिती समोर येत आहे. पंतप्रधानांच्याही जम्मू काश्मीर दौऱ्यावर हल्ल्याचा कट होता, मात्र हा दौराच रद्द झाला होता. त्याशिवाय हाती लागलेली आणखी माहिती म्हणजे काही स्थानिक दहशतवादी पर्यटकांच्या गटात आधीपासूनच मिसळले गेले होते, पर्यटकांची खडानखडा माहिती हे दहशतवादी घेत होते आणि त्यानंतर पहलगामचा हल्ला झाला.
कंदाहार विमान अपहरण प्रकरण नेमकं काय?
राऊफ असगरने भारतीय एअरलाइन्सच्या IC-814 विमानाच्या अपहरणाची योजना आखली होती. या अपहरणामुळे भारत सरकारला मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद झरगर यांना सोडावे लागले. कंदाहार विमान अपहरण प्रकरण, ज्याला IC-814 अपहरण म्हणूनही ओळखले जाते, हे भारताच्या नागरी विमान वाहतुकीच्या इतिहासातील एक अत्यंत गंभीर आणि वादग्रस्त घटना आहे. 24 डिसेंबर 1999 रोजी, इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट IC-814 या एअरबस A300 विमानाचे अपहरण करण्यात आले. हे विमान नेपाळमधील काठमांडू येथून दिल्लीकडे निघाले होते. भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर सुमारे 40 मिनिटांनी, पाच हिजबुल मुजाहिदीनच्या (Harkat-ul-Mujahideen) दहशतवाद्यांनी विमानाचे अपहरण केले. विमानात 179 प्रवासी आणि 11 कर्मचारी होते. अपहरणकर्त्यांनी विमानाला अमृतसर, लाहोर आणि दुबई येथे उतरवले. दुबईमध्ये त्यांनी 27 प्रवाशांना सोडले आणि एका प्रवाशाची हत्या केली. शेवटी, विमान अफगाणिस्तानमधील तालिबान-नियंत्रित कंदाहार येथे उतरवण्यात आले. अपहरणकर्त्यांनी भारत सरकारकडे तीन दहशतवाद्यांची सुटका करण्याची मागणी केली. यानंतर मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख, मुश्ताक अहमद झरगर या तिघांची सुटका 31 डिसेंबर 1999 रोजी करण्यात आली, ज्यामुळे अपहरण समाप्त झाले.