नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं तयारी सुरु केली आहे. पाकिस्तान सीमेलगतच्या भागात भारतीय सैन्यानं युद्धसरावाला सुरुवात केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) निष्पाप भारतीयांचे बळी घेणाऱ्या अतिरेक्यांना गाडण्याचा इशारा दिला आहे. यामुळं पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली असून पाकिस्तानातल्या अनेक सेनाधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना परदेशी पाठवून दिल्याची माहिती आहे. तसेच गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देखील देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत.
पाकिस्तानी नागरिक देशात थांबू नये, याची खात्री करावी-
केंद्र सरकारने दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर एकही पाकिस्तानी नागरिक देशात थांबू नये, याची खात्री करावी, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली. पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले 18 प्रकारचे सर्व व्हिसा 27 एप्रिलपासून रद्द करण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. यानंतर अमित शाह यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना फोन करत पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील याची खात्री करा, असे निर्देश दिले आहेत.
पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर- देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, महाराष्ट्रात प्रत्येक पोलिस स्थानकाला त्याची सूचना दिली जात आहे. कोणताही पाकिस्तानी नागरिक 48 तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असून, जो कुणी अधिक काळ वास्तव्य करताना आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसारच ही कारवाई होईल. शत्रूचा हल्ला किंवा देशावरील संकटकाळात कायमच सर्व राजकीय पक्ष राहिले, असेच या देशात आजवर झाले. स्व. अटलजींनी स्व. इंदिराजींना संपूर्ण पाठिंबा दिला होता. पण, उबाठाने जे छोटे मन दाखविले, त्याला या देशातील जनता कधीच माफ करणार नाही.
देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला हा हल्ला-
काश्मीरच्या पहलगाममधला भ्याड हल्ला हा फक्त पर्यटकांवर झालेला हल्ला नव्हता. तर तो देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला हा हल्ला होता. त्यामुळे या हल्ल्याला भारताकडून काय उत्तर दिलं जाणार याची उत्सुकता देशवासियांना आहे. तर हल्ल्याच्या तिसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आश्वस्त केलं. शत्रूनं विचारही केला नसेल असा धडा त्यांना शिकवू असा निर्धार नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.