उस्मानाबाद : तिकिटासाठी प्रवाशाने दिलेले 10 रुपयांचे नाणे (10 Rs Coin) नाकारून प्रवाशाला वाईट वागणूक दिल्याप्रकरणी उस्मानबाद ग्राहक आयोगाने (Osmanabad consumer court) सोलापूर जिल्ह्यातील बार्शी डेपोच्या एसटी कंडक्टरला (St Conductor) आठ हजार रुपयांचा दंड ठोठावला. या निकालामुळे दहा रुपयांचे नाणे नाकारणाऱ्या व्यापाऱ्यांनाही धडा मिळाला आहे.
अर्जदाराला आठ हजार रूपये देण्याचे आदेश
उस्मानाबादचे अल्लाऊद्दीन बक्षु सय्यद 22 मे 2018 रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास बार्शी डेपोच्या गाडीने वैराग ते उस्मानाबाद येण्यासाठी एसटीतून (एमएच20डी 8169) प्रवास करीत होते. बसचे कंडक्टर बी.वाय.काकडे यांनी प्रवाशी अल्लाऊद्दीन बक्षु सय्यद यांना तिकीट काढण्यासाठी रकमेची मागणी केली.त्यावेळी अल्लाऊद्दीन बक्षु सय्यद यांनी अपंगत्वाचे ओळखपत्र दाखवून 10 रूपयाचे एक नाणे व 5 रूपयाचे एक नाणे कंडक्टर यांना दिले. यावेळी कंडक्टर काकडे यांनी 10 रूपयाचे नाणे चालत नाही असे सांगितले. कंडक्टर यांनी 10 रूपये नाणे नाकारले. त्याबद्दल अल्लाऊद्दीन बक्षु सय्यद यांनी उस्मानाबाद ग्राहक आयोगाकडे कंडक्टर काकडे व बार्शी डेपोविरूध्द तक्रार दाखल केली. त्यानंतर उस्मानबाद ग्राहक आयोगाने कंडक्टरविरूध्द निकाल दिला. त्यात अर्जदाराला आठ हजार रूपये देण्याचे आदेश केले.
दहा रुपयांचे नाणे चलनात
दहा रुपयांची नाणी चलनातून बाद झाल्याच्या भीतीने मराठवाड्यात कोणीही दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देत आहेत. सर्वसामान्य नागरिक, काही विक्रेते त्रस्त झाले आहेत. बहुतेकदा काही ग्राहक चिल्लर सांभाळायला अडचण नको म्हणून दहाचे नाणे स्वीकारत नाहीत. नाणे सांभाळण्याची गैरसोय टाळण्यासाठी काही जण दहा रुपयाच्या नोटेची मागणी करताना दिसतात. मात्र दहा रुपयांचे नाणे हे भारतीय चलनात असून ते कोणालाही नाकारता येत नाही. 10 रुपयांची सर्व नाणी वैध असून स्वीकारण्यायोग्य आहेत. त्यामुळे या नाणांच्या माध्यमातून व्यवहार होऊ शकतो.' असंही रिझर्व बँकेनं स्पष्ट केलं आहे. ही सर्व नाणी वेगवेगळ्या फीचर्समध्ये आहेत. त्यामुळे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे विविध पैलू प्रदर्शित होतात. त्यामुळे वेळोवेळी ही वेगवेगळ्या डिझाईनची नाणी चलनात आणली गेली आहेत. असं रिझर्व बँकेने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. तसेच सर्व बँकांनी 10 रुपयांची नाणी स्वीकारावीत असे आदेश रिझर्व बँकेने दिले आहेत.