कोल्हापूर : महाराष्ट्रात शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांची विक्री आता 1 नोव्हेंबरपासून ऑनलाईन होणार आहे. यासाठी कृषी दुकानदारांना पीओएस (पॉईंट ऑफ सेल) मशीन वाटप करण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांचं आधारकार्ड आणि त्यांचा अंगठा जुळल्याशिवाय त्याला रासायनिक खत मिळणार नाही, अशी ऑनलाईन खत विक्री झाली, तरच कंपनीला सबसिडी मिळणार असल्याने खताच्या काळ्या बाजाराला आता आळा बसणार आहे.

केंद्राच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी आधार कार्डचा वापर करावा लागणार आहे. खरेदीदार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, त्यास आवश्यक खताचं विवरण या नोंदी खत विक्रेत्याद्वारा पीओएस मशीनवर उपलब्ध होणार आहेत. या नोंदीसाठी खरेदीदार शेतकऱ्याला हाताच्या बोटाचा ठसा मशीनवर द्यावा लागणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 747 मशीनचं वाटप करण्यात आलं होत. यापैकी 681 मशीन उद्यापासून कार्यान्वित होणार आहेत. काही ठिकाणी नेट कनेक्टिव्हीटीची अडचण आहे, तर 900 खत विक्रेत्यांना अजून पीओएस मशीन मिळाल्या नाहीत. त्यांना ते महिनाभरात मिळणार आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशींनी यासंदर्भात माहिती दिली.

दुकानदाराने आणलेल्या किंवा त्याच्याकडे असलेला खताचा पूर्ण साठा या पीओएस मशीनमध्ये फीड करणे बंधनकारक राहणार आहे. दररोजच्या दररोज होणाऱ्या या ऑनलाईन विक्रीमुळे खताच्या काळ्या बाजाराला मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होणार आहे.