पंढरपूर: कार्तिकी एकादशीनिमित्त आज सुमारे सहा लाख भाविकांनी विठूरायाच्या पंढरीत हजेरी लावली.  राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पहाटे सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न झाली.


यावेळी कर्नाटकातील विजापूर येथील बळीराम चव्हाण आणि शिनाबाई चव्हाण या दाम्पत्याला मानाच्या वारकऱ्यांचा मान मिळाला.

कर्नाटक परिवहन विभागात कंडक्टर असलेल्या चव्हाण यांनी महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा असं साकडं विठूरायाला घातलं.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील जनता सुखी आणि सुरक्षित राहू दे, असं साकडं विठूरायाला घातलं.

दरम्यान, वारकऱ्यांच्या मागणीनुसार मंदिर समितीला सहअध्यक्षपद निर्माण केलं आहे, शिवाय समितीमध्ये रिक्त असलेल्या 3 जागांवरही वारकरी प्रतिनिधी भरले जातील, असं यावेळी पाटील यांनी सांगितलं.

यावेळी मंदिर समितीच्यावतीने महसूल मंत्र्यांना चांदीची विठ्ठल मूर्ती देऊन तर मानाचे चव्हाण दाम्पत्याचा प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला.

इतकंच नाही तर राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने मानाच्या दाम्पत्याला वर्षभर मोफत प्रवासाचा पास देण्यात आला.

मंदिर समितीच्यावतीने घोषित केलेल्या टोकन दर्शन व्यवस्थेच्या टोकानाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी आळंदी येथील एका भक्ताने मंदिराला अजाण वृक्षाचे रोप अर्पण केले.