कुतूहल माणसांविषयी असतं, गावांविषयी असतं... अनोळखी माणसं-गावं यांच्याहून कैकपट जास्त कुतूहल ओळखीच्या माणसा-गावांविषयी वाटत असतं. ज्या मातीत नाळ पुरली, त्या मातीची ओढ इतकी खेचून घेत असते की, इतिहास-भूगोल नावडणारे लोकही नकळत मुळं धुंडाळत बसतात. एखादा साधा शब्द, बोलीची लकब, विशिष्ट चेहरेपट्टी, देहबोली, खाद्यपदार्थ, झाडंझुडपं, इमारती, रस्ते... शेकडो गोष्टी... त्यांची झलकदेखील पटकन नॉस्टेल्जिक बनवते. एखाद्या उत्कृष्ट पुस्तकातून असं जग समोर आल्यावर तर कैक महिने सगळं रंग, गंध, आवाज, स्पर्श, चवीसह मनात ठाण मांडून बसतं. आवडता पाहुणा असलेली ही पुस्तकं बघता बघता घरातला एक कायमचा सदस्य होऊन राहतात निवांत. त्यांच्याशी कधीही संवाद साधावा, ती आपल्याशी बोलायला आणि आपलं ऐकायला देखील उत्सुक आहेत असं वाटतं. सुधीर रसाळ यांच्या ‘लोभस : एक गाव - काही माणसं’ या पुस्तकामुळे ही जाणीव मनात ठळक झाली.



यात काही व्यक्तिचित्रं आहेत; पैकी पहिलंच ‘गावा’चं आहे. ‘औरंगाबाद : महाराष्ट्रातली दिल्ली’ असं त्याचं शीर्षक. औरंगाबादला ‘गाव’ का म्हटलं असावं, हे लेख वाचण्यास सुरुवात करताच समजतं. सुमारे ८० वर्षांपूर्वीची अख्ख्या शहराची लोकसंख्या ४०,००० आणि वेरुळच्या लेण्यांमधला शुकशुकाट हे वाचूनच ते जग किती आताहून खूप निराळं होतं हे उलगडतं. हे शहराचं सुंदर वर्णन वा निखळ ऐतिहासिक माहिती देणारं लेखन नाही. तिथला इतिहास, संस्कृती ओघात येतातच; पण शिक्षण, भाषा, साहित्य, पत्रकारिता यांचा एरवी सहजी दृष्टीस पडला नसता असा दस्तावेज हाती लागतो.

हैद्राबाद संस्थानाच्या हद्दीत कोणती मराठी पुस्तकं यावीत हे सरकार ठरवणार, हरिभाऊंच्या ऐतिहासिक कादंबऱ्या व तुळजापूरकरांच्या ‘माझं रामायण’वर बंदी, वकील मंडळींनी एकत्र येऊन सुरू केलेली सरस्वती भुवन ही राष्ट्रीय शाळा, व्याख्यात्यांना भाषणाची प्रत आधी सी.आय.डी.कडे द्यावी लागणं... एक ना दोन शेकडो गोष्टी! रझाकारांचे किस्से मराठवाड्यात लहानपणी अनेक ऐकले होते, पण त्यापलीकडचे हे तपशील कल्पनेतही नव्हते. अधूनमधून खास मराठवाडी शब्द, क्रियापदं ‘खूप वर्षांनी’ भेटले म्हणून थबकत मी सलग दोन-तीन दिवसांत हे पुस्तक ‘समजून घेत’ वाचलं.

होय, समजून घ्याव्यात अशा अनेक गोष्टी या पुस्तकात आहेत; कारण या व्यक्तिचित्रांमधून माणसांचे चेहरे जितके दिसतात, त्याहून जास्त माणसांचा मेंदू दिसतो. मराठीतील इतर व्यक्तिचित्रांच्या पुस्तकांहून या अनोख्या वैशिष्ट्यामुळे हे पुस्तक वेगळं उठून दिसतं. गावात एका मोठ्या कालखंडाचा दीर्घ प्रवास करून आलं की, त्यात ओझरती दिसलेली काही माणसं पुढील लेखांमधून सविस्तर भेटतात. वडील न. मा. कुलकर्णी, गुरू भगवंतराव देशमुख, म. भि. चिटणीस, अनंतराव भालेराव, वा. ल. कुलकर्णी, नरेंद्र चपळगावकर आणि गो. मा. पवार अशा सात व्यक्तींची चित्रं यात आहेत. त्यांच्याविषयीच्या लेखनातले हे दोन मासले –





खरंतर जवळच्या माणसांविषयी लिहिणं ही गोष्ट कुणासाठीही फार अवघड. वडील व सहकारी – मित्र यांच्या निमित्ताने लेखकाने स्वत:च्या आयुष्याकडेही तटस्थ जिव्हाळ्याने पाहिलं आहे. माणसांचं दिसणं, आवाज अशा बाह्य गोष्टींसह स्वभाव, वृत्ती, विचार करण्याची पद्धत असं बरंच काही आंतरिक उलगडत जातं. लहान घटनांमधून, साध्या बोलण्यातून माणसं कशी ओळखीची होत जातात, कशी समजू लागतात – हे बारकाईने टिपलेलं आहे. काळ, शहर आणि माणसं यांच्याविषयी लिहिताना त्यांच्या समीक्षेच्या काहीशा कोरड्या, रुक्ष भाषेत ओलावा, स्निग्धता आल्याने ती सजीव वाटतेय. आठवणी सांगताना सुरात मृदुता आहे, मात्र अकारण हळवेपणा नाही. औरंगाबादमधील सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक वातावरण निव्वळ भावनिक नव्हे, तर वैचारिक अंगाने जाणून घेता येणे ही मोठी बौद्धिक मेजवानीच या पुस्तकातून मिळते. इतर व्यक्तींविषयी लिहिताना लेखकाचा वैचारिक प्रवास देखील उलगडत जातो.

घटना अनेक घडत असतात, शिकवणारे – संवाद साधणारे लाख बोलत असतात; पण त्या घटना परिणामांसह निरखणारी आणि शिकत-जाणत स्वत:चा विकास घडवणारी ज्ञानलालसा असणारी व्यक्ती नसेल तर ते विरूनही जातं. त्यामुळे ही माणसं जितकी मोठी आहेत, तसंच मोठेपण लेखकाच्या अंगी आहे. टिपलेल्यातलं जितकं मांडलं आहे, ते उत्तम स्मरणशक्तीतून आलेलं असल्याने वाचकाला दीर्घकाळ पुरावं असं असलं तरी त्यापलीकडे देखील राहिलेलं पुष्कळ असणार असं वाटत राहतं. अमुक व्यक्तिचित्र अधिक चांगलं असं निवडता येत नसलं, तरी मला व्यक्तिश: सर्वाधिक आवडलं ते ‘भाऊ : आगरकरी वळणाचे वडील’ हे व्यक्तिचित्र. ते मी चार वेळा वाचलं आणि वाचताना थांबून मित्रमैत्रिणींना फोन करून काही ओळी वाचूनही दाखवल्या. त्यातला हा एक उतारा :

गेलेले दिवस चांगल्या-वाईट अनुभवांचे मिश्र दिवस होते याची जाणीव असल्याने एरवी स्मरणरंजनपर मजकुरात सामान्यत्वे दिसते तशी ‘गेले ते दिन’ अशी हळहळ नाही. अभ्यास व वाचनाने त्यांना सतत जुन्या-नव्याशी जोडून ठेवल्याने फक्त जुन्याचा हात धरून वाटचाल झाली नाही, समीक्षेने त्यांना कायम नवं ठेवलं असणार; हे हा ‘इतिहास’ वाचताना देखील जाणवत राहतं.

आई व इतर काही स्त्रियांचे उल्लेख यात आहेत; त्यातून त्यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन थोडा जाणता येतो. मात्र आई व पत्नी अशी ( निदान ) अजून दोन व्यक्तिचित्रं या पुस्तकात असती, तर अजून एक निराळा इतिहास उलगडला असता. पुढील आवृत्तीत ही भर घातली गेली, तर सोन्याला सुगंध!

पुस्तकाचं मुखपृष्ठ मात्र मला फारसं आवडलं नाही. त्यावरील रंग ‘मराठवाड्या’चे नाहीत. धूळभरलं वातावरण, हिरव्याचा अभाव सांगणारा मातकटपणा, भक्क निळं आकाश या ऐवजी प्रेमकवितेच्या पुस्तकावर असावेत तसे बालिश रंगाचे फटकारे आहेत आणि शीर्षकाची कॅलिग्राफीही पुस्तकाच्या प्रगल्भ, गंभीर मूडशी विसंगत हलकीफुलकी आहे. पुढील आवृत्तीसाठी प्रकाशकांनी काही वेगळा विचार अवश्य करावा.

लक्ष विचलित करण्याची शेकडो साधनं परजलेली असण्याच्या काळात पुस्तक नावाच्या एका जुन्या अवजारानं स्वत:शी असं खिळवून ठेवावं, ही दुर्मिळ घटना घडवणारं ‘लोभस’ वाचकांनी विकत घेऊन वाचावं, संग्रही ठेवावं.

चालू वर्तमानकाळ’ सदरातील याआधीचे ब्लॉग –

चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर

चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड

चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे

चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं

चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं

चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या

चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात…

चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील…

चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत

चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची!

चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब