नंदुरबार : पावसाने पाठ फिरवल्याने नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यातील विविध भागात तब्बल 11 हजार हेक्टर बागायती कापसाची लागवड झाली आहे. काही भागात 10 जून रोजी झालेल्या पावसावर कोरडवाहू शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. मात्र पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात 10 जून रोजी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र जवळपास दहा दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने पीक जगवण्याचं आवाहन शेतकऱ्यांसमोर आहे. त्यासाठी आता शेतकरी मजूर लावून कापसाला पाणी देऊन आपलं पीक जगवण्याचा प्रयत्न करत आहेत.
बागायतदार शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापसाची लागवड केली होती. मात्र आता भूजलपातळी खालावल्याने पाणी देण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यात लोडशेडिंगमुळे अजूनच तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कापूस लागवडीची घाई करु नका!
कापसाची पहिल्या पावसानंतर लागवड केली जाते. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी या पिकाला चुव्वा पद्धतीने पाणी द्यावं, तसेच ज्या शेतकऱ्यांची कापूस लागवड बाकी असेल त्यांनी घाई करू नये, जिरायती कापूस लागवड जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यापर्यंत करता येते, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.