हॅमिल्टन : टी 20 मालिका 5-0 ने जिंकणाऱ्या टीम इंडियाला पहिल्या एकदिवसीय सामन्यात मात्र पराभवाचा सामना करावा लागणार आहे. रॉस टेलरच्या खणखणीत शतकाच्या जोरावर यजमान न्यूझीलंडनं हॅमिल्टनच्या पहिल्या वन डेत टीम इंडियावर चार विकेट्सनी दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह न्यूझीलंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारतानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 348 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. पण अनुभवी रॉस टेलरनं हेन्री निकोलस आणि कर्णधार टॉम लॅथमच्या साथीनं महत्वपूर्ण भागीदाऱ्या साकारत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. टेलरनं वन डे कारकीर्दीतलं 21वं शतक झळकावताना नाबाद 109 धावांची खेळी उभारली. हेन्री निकोलसनं 78 तर लॅथम 69 धावांचं योगदान दिलं.




तत्पूर्वी, मुंबईच्या श्रेयस अय्यरनं हॅमिल्टन वन डेत भारताकडून आपलं पहिलं शतक साजरं केलं. त्यानं 107 चेंडूत 11 चौकार आणि एका षटकारासह 103 धावांची खेळी केली. श्रेयसनं कर्णधार विराट आणि त्यानंतर लोकेश राहुलसह शतकी भागिदाऱ्या साकारल्या. त्यामुळे टीम इंडियाला 50 षटकांत चार बाद 347 धावांचा डोंगर उभारता आला. विराटनं 51 तर राहुलनं 88 धावांची तडाखेबाज खेळी केली. भारताच्या पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवालनं हॅमिल्टनमध्ये वन डे पदार्पण केलं. या दोन्ही फलंदाजांनी भारतीय डावाची सुरुवात केली. 2016 नंतर भारताकडून दोघंही नवे फलंदाज सलामीला येण्याची पहिलीच वेळ ठरली.

सलामीला आलेल्या मयांक अगरवालने 32 तर पृथ्वीने 20 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या विराट आणि श्रेयसने शतकी भागीदारी केली. विराट 51 धावांवर बाद झाला तर श्रेयस अय्यरने आपले पहिले शतक झळकावले. त्याने लोकेश राहुलसोबत देखील चांगली भागीदारी केली. राहुलने नाबाद 88 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 षटकार आणि तीन चौकार लगावले. तर शेवटी आलेल्या केदार जाधवने देखील तडकाफडकी खेळी करत 15 चेंडूत 26 धावा केल्या.


 348 धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना सलामीवीर मार्टिन गुप्टिल आणि निकोलसने चांगली सुरुवात करुन दिली. गुप्टिल 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला टॉम ब्लुंडेल 9 धावाच करु शकला. त्यानंतर आलेल्या रॉस टेलर आणि निकोलसने चांगली भागीदारी केली. निकोलसने 78 धावा केल्या तर टेलरने 84 चेंडूत 109 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 4 षटकार लगावले. त्याने लॅथम 69 सोबत चांगली भागीदारी करत संघाला विजयपथाकडे नेले. भारताकडून कुलदिप यादवने 2 तर शार्दुल ठाकूर आणि शामीने एक-एक विकेट घेतली.