हेमिल्टन : भारत आणि न्यूझीलंडमधील तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील पहिला सामन्यात भारताने निर्धारित 50 षटकात चार विकेट्सच्या मोबदल्यात 347 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडसमोर विजयासाठी 348 धावांचं आव्हान आहे. श्रेयस अय्यरच्या दमदार शतक, केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 347 धावांची मजल मारली.


हेमिल्टनच्या सेडॉन पार्कमध्ये हा सामना खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. या एकदिवसीय सामन्यात पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवालला पदार्पणाची संधी दिली. याशिवाय कुलदीप यादव आणि केदार जाधवचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश झाला आहे.

त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल या सलामीच्या जोडीने 50 धावांची भागीदारी रचली. आठव्या षटकात कॉलिन डी ग्रॅण्डहोमने भारताला पहिला झटका दिला. कॉलिन डी ग्रॅण्डहोमच्या गोलंदाजीवर टॉम लॅथमकडे झेल देत पृथ्वी शॉ बाद झाला.

पृथ्वी शॉ 20 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. पृथ्वी शॉनंतर मयांक अग्रवालही बाद झाला. मयांक अग्रवाल नवव्या षटकात टिम साऊदीने टॉम ब्लंडेलकरवी झेलबाद केलं. मयांक अग्रवालने 32 धावा केल्या. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी भागीदारी रतली. 29व्या षटकात विराट कोहली बाद झाला. ईश सोढी विराटला बोल्ड करत भारताला तिसरा झटका दिला. त्याने 51 धावा केल्या.

मुंबईच्या श्रेयस अय्यरने न्यूझीलंड दौऱ्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात शतक झळकावून भारतीय डावाला आकार दिला. श्रेयस अय्यरचं एकदिवसीय सामन्यातलं हे पहिलंच शतक आहे. त्याने 101 चेंडूंत शतक झळकावलं. त्याच्या या खेळीत 11 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. तो 107 धावा करुन बाद झाला.

दुसरीकडे के ए राहुलने तीन चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 88 धावा केल्या. तर केदार जाधवने तीन चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने नाबाद 26 धावांचं योगदान दिलं.

न्यूझीलंडतर्फे टिम साऊदीने दोन, ग्रॅण्डहोम आणि ईश सोढीने प्रत्येकी एक विकेट घेतली.