नागपूरः शहरात ओमिक्रॉन बीए-5 या सबव्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी घाबरु नका, असा धीर देत कोरोनाची लक्षणे दिसल्यास तत्काळ चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान मागील 24 तासांमध्ये 44 नवे बाधित आढळून आले आहे. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या 278 पर्यंत पोहोचली आहे.


नागपूरात ओमिक्रॉन बीए-5 या व्हेरिएंटच्या दोन रुग्णांची नोंद झालेली आहे. कोरोनाबाधित दोन रुग्णांमध्ये ओमिक्रोन बीए-5 व्हेरिएंटची लक्षणे आढळलेली आहेत. यामध्ये 45 वर्षीय महिला आणि 27 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णांची प्रकृती व्यवस्थित असून दोघेही घरीच उपचार घेत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात मागील 24 तासांत 44 नवीन बाधित आढळले असून यात शहरातली 24 जणांचा समावेश आहे. ग्रामीणमधील 17 तर जिल्ह्याबाहेरील 3 जणांचा समावेश आहे. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 5 लाख 78 हजार 225 पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान 19 जणांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु बाधितांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्यातील सक्रिय बाधित संख्या 278वर पोहोचली आहे. दरम्यान एकूण 2 हजार 123 चाचण्या झाल्या. ओमिक्रॉनची दोन रुग्ण आढळून आल्याने चाचणीवर भर देण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे. महानगरपालिकेतर्फे शहरात 44 कोरोना चाचणाी केंद्र सुरु करण्यात आले आहे. याशिवाय मोबाईल टेस्टिंग व्हॅनची सुद्धा सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नागपुरात कोरोना रुग्णांचीही संख्या वाढत आहे.


विदेशातून येणाऱ्यांवर लक्ष


मनपातर्फे प्रत्येक नमुन्याची जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येत आहे. यामधून दोन बाधितांना बीए-5 व्हेरिएंटची लागण झाली असल्याचे पुढे आले आहे. दोन्ही बाधितांची प्रकृती व्यवस्थित असून ते घरी आयसोलेशनमध्ये आहेत. नागपुरात विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती गोळा करणे सुरु आहे. कोरोनाची थोडीही लक्षणे आढळलेल्या नागरिकांची चाचणी केली जात आहे. यासाठी रॅपिड रिस्पॉन्स टिम तैनात करण्यात आलेली आहे.


काळजी घेण्याची गरज


कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तामिळनाडू व महाराष्ट्राच्या इतरही भागात आढळून आलेला ओमायक्रॉनचा बीए-५ या सबव्हेरिएंटचे दोन तर एसक्यू सबव्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. परंतु नागपुरातील तिन्ही रुग्ण घरीच उपचाराने बरे झाले आहेत. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट भयवाह ठरली. यात डेल्टाच्या प्रादुर्भावामुळे रुग्ण व मृत्यू संख्या झपाट्याने वाढली. तिसरी लाट सौम्य राहिली. ओमायक्रॉमचा प्रभाव दिसून आला नाही. मात्र आता परत काळजी घेण्याची गरज आहे.