Yashashree Shinde Case: नवी मुंबई : उरणमधील (Uran Crime) यशश्री शिंदे (Yashashree Shinde) हिच्या हत्या प्रकरणानं संपूर्ण देश हादरला. यशश्रीच्या मृत्यूनंतर उरणसह राज्यभरात (Maharashtra News) अनेक ठिकाणी संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं होतं. पोलिसांनी या प्रकरणाची सूत्रं वेगानं फिरवली आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या. कर्नाटकातून (Karnataka) यशश्रीचा आरोपी दाऊद शेखला (Dawood Sheik) पोलिसांनी मोठ्या शिताफिनं अटक केली. अशातच आता या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे, यशश्रीच्या हत्येनंतर तिचा मोबाइल गहाळ झाला होता. अखेर मोबाईल पोलिसांच्या हाती लागला असून आता या प्रकरणात आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. 


यशश्री शिंदे हिच्या हत्येनंतर आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी कर्नाटक (गुलबर्गा) येथून अटक केली. आतापर्यंत या प्रकरणात अनेक महत्त्वाचे आणि खळबळजनक खुलासे करण्यात आले आहेत. अटक केल्यानंतर आरोपी दाऊद शेखवर पोलिसांकडून अॅट्रॉसिटी अॅक्टनुसारही गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, त्याला 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उद्या (मंगळवारी) दाऊद शेखची पोलीस कोठडी संपणार आहे, त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. 


गेल्या पाच वर्षांपासून आमच्या दोघांमध्ये मोबाईलवरुन संपर्क होता, अशी कबुली अटकेनंतर दाऊद शेखनं दिली आहे. मात्र, यशश्रीचा मोबाईल गहाळ झाला होता. त्यामुळे पोलिसांकडे दाऊदनं कबुली दिल्यानंतरही बक्कळ पुरावा नव्हता. आता यशश्रीचा मोबाईल सापडल्यामुळे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करणं आता आणखी सोपं होणार आहे. तसेच, गहाळ झालेला मोबाईल सापडल्यामुळे या प्रकरणी आता आणखी खळबळजनक खुलासे होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी डाटा मिळवण्यासाठी लॅबकडे पाठवला आहे. 


यशश्रीसोबत नेमकं काय घडलं? 


उरणमधील यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आलेली. एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमानं यशश्रीला अक्षरश: हालहाल करुन ठार मारल्याची (Uran Murder Cae) माहिती समोर आली. यशश्रीच्या मारेकऱ्यानं निर्दयीपणे तिच्यावर वार केले, तिच्या शरीराची अक्षरशः विटंबना केली. तिच्या गुप्तांगावर आणि पोटावर अनेक वार करुन यशश्रीचा मृतदेह छिन्नविछिन्न करण्यात आला होता. त्यानंतर उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागील मैदानावरील झुडुपांमध्ये तिचा मृतदेह फेकून देण्यात आलेला. यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात एका दाऊद शेख नामक व्यक्तीचा उल्लेख केला. तेव्हापासूनच पोलिसांनी दाऊद शेखला शोधण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी जंग जंग पछाडलं, अखेर दाऊदचा सुगावा पोलिसांना लागलाच. यशश्रीचा आरोपी दाऊद शेखच्या कर्नाटकातून पोलिसांनी मुसक्या आवळल्या.