Navi Mumbai News : नवी मुंबईतील वाशीतील एपीएमसी मार्केटमधील (Vashi APMC) प्रसिद्ध आंबा व्यापारी अशोक हांडे यांच्याकडे आज (25 नोव्हेंबर) कोकणातील देवगडचा हापूस आंबा (Devgad Alphonso Mango) दाखल झाला आहे. एपीएमसीमध्ये आंब्याची पहिलीच पेटी आली असून देवगडमधील कातवण गावचे शेतकरी दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे या शेतकऱ्यांनी पाठवला आहे. या दोन डझनाच्या पेटीला नऊ हजार रुपयांचा दर मिळाला आहे. 


आंबा मोसमाची आलेली पहिली पेटी अशोक हांडे यांच्याकडून मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक चरणी अर्पण करण्यात येणार आहे. यावर्षी पाऊस उशिरापर्यंत राहिल्याने थंडी पडायला वेळ लागला. याचा परिणाम हापूस आंब्याच्या मोहोरावर झाला आहे. मोहोर येण्यास कालावधी लागल्याने या वर्षी हापूस आंब्याचा मुख्य सीझन मार्चऐवजी एप्रिल महिन्यात सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारचा मुहूर्ताला आंबा रवाना
देवडमधील कातवण गावातील दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी आपल्या बागेतील हापूस आंबे मुंबईतील वाशी मार्केटला पाठवले आहेत. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारचा मुहूर्त साधून दोन डझन आंब्याची पहिली पेटी कालच (24 नोव्हेंबर) वाशी मार्केटला रवाना केली होती. हंगामातील पहिला आंबा हा मुहूर्ताचा आंबा मानला जातो. त्यामुळे या आंब्याची विधिवत पूजा करुन संपूर्ण हंगाम चांगला जाऊ दे अशी प्रार्थनाही केली जाते. अगदी पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आजच्या बागायतदारांसह व्यापाऱ्यांनीही जपली आहे. त्यामुळे बाजारात जाण्यापूर्वी हापूस आंब्याच्या पेटीची पूजा करण्यात आली.


15 ऑगस्टच्या दरम्यान मोहोर 
कातवण इथले आंबा बागायतदार शिंदे यांच्या घरानजीकच्या आंबा बागेत हापूसच्या कलमांना 15 ऑगस्टच्या दरम्यान मोहोर आला होता. तो मोहोर तसाच टिकवून, मेहनत घेतली. कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यांनी या मोहराची व्यवस्थित मशागत केल्यामुळे योग्य प्रमाणात फळधारणाही झाली. त्यामुळेच या चार कलमांवर मिळालेल्या आंब्याचे पहिले फळ काढत देवगड हापूसची पहिली पेटी आज मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या शुभ मुहूर्त रवाना केली.


मुख्य हंगाम सुरु होण्यास अवधी
दरवर्षी वाशी एपीएमसीमध्ये फेब्रुवारी महिन्यात हापूस आंब्याच्या आवक होण्यास सुरुवात होते. त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आवक वाढून मुख्य हंगाम जोर पकडतो. यंदा आंब्याचं उत्पादन कमीच राहणार असल्याचं तज्ज्ञ सांगतात. परतीच्या पावसामुळे झालेलं मोठं नुकसान यामुळे आंब्याचा मोहोर गळून पडत आहे. त्यामुळे आंब्याची पहिली पेटी जरी दाखल झाली असली तरी हापूसचा मुख्य हंगाम सुरु होण्यात अजून अवधी आहे.