Navi Mumbai Latest News : कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. शनिवारपासून मतदार नाव नोंदणीस सुरुवात होणार असून ही नोंदणी येत्या सात नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. दावे आणि हरकती, सूचना ही प्रक्रिया पार पडल्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी प्रारूप आणि त्यानंतर 30 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत तीन वर्षे अध्यापन केलेले शिक्षक मतदान करण्यासाठी पात्र असणार आहेत. निवडणुकीच्या तयारीची माहिती कोकण विभाग, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त मनोज रानडे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.
कोकण शिक्षक मतदार संघातील विधान परिषद सदस्याचा कार्यकाळ फेब्रुवारी 2023 मध्ये संपुष्टात येते आहे. त्यामुळे या मतदार संघाची निवडणूक घेण्याकरिता निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. या तयारीची माहिती कोकण विभाग, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त मनोज रानडे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. मतदार नोंदणीची जाहीर सूचना उद्या काढण्यात येणार आहे. त्यानंतर उद्यापासूनच मतदार नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीसाठी 36 हजार मतदारांची नोंद झाली होती. यावेळी ती 40 हजारपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. जास्तीत जास्त शिक्षकांनी आपल्या नावाची नोंदणी मतदार यादीत करावी यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शाळाशाळांमध्ये जाऊन शासनाच्या वतीने जनजागृती केली जात आहे, असे मनोज रानडे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी माहिती उपसंचालक गणेश मुळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सर्वांना नोंदणी करावी लागणार
पूर्वी शिक्षक मतदार संघाची मतदार यादी अपडेट केली जात होती. नवीन मतदारांची नावे वाढवली जात होती. मात्र गेल्या निवडणुकीपासून ही पद्धत बंद करण्यात आली आहे. ही यादी पदवीधर मतदार संघाप्रमाणे नव्याने तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनाच नोंदणी करावी लागणार आहे. कोकण विभागात वास्तव्यास असलेल्या माध्यमिक शिक्षकांना आपले नाव मतदार यादीत नोंदविता येणार आहे. राजकीय पक्षांचे अर्जांचे गठ्ठे स्वीकारणार नाही
मतदार नोंदणीसाठी शिक्षकांनी आपले अर्ज भरून हातोहात नोंदणी कार्यालयापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. शिक्षण संस्थांनी पाठवलेले अर्जांचे गठ्ठे स्वीकारण्यात येणार आहेत. मात्र तसेच गठ्ठे राजकीय पक्षांचे स्वीकारले जाणार नाहीत. वास्तव्याचा पुरावा म्हणून कोणताही एक पुरावा चालणार नाही. नोकरी कोणत्याही विभागात असली तरी वास्तव्याचा पुरावा कोकण विभागात असलेल्या शिक्षकांना मतदान करता येणार आहे.