नवी मुंबई : नेरुळ, सेक्टर-28 येथील उद्यान, मैदान, दिव्यांग केंद्र, ज्येष्ठ नागरिक संघ, पोलिस स्थानकासाठी आरक्षित भूखंड सिडकोने निविदा काढून गामी या खासगी बांधकाम व्यावसायिकाला विकला आहे. काही महिन्यांपूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेने नावापुरती राज्य सरकारकडे याबाबत तक्रार केली होती. परंतु, पालिकेची बोटचेपी भूमिकेला डावलून मुजोर सिडको च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा व्यवहार घडवून आला. मनसे प्रवक्ते व शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने(MNS) या व्यवहाराला तीव्र विरोध करत सेक्टर-28 येथे या भूखंडा शेजारी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात नेरुळ (Navi mumbai), सीवूड्स, जुईनगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मनसेच्या या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिला.
दिव्यांग केंद्र आमच्या हक्काचे...नाही कोणाच्या बापाचे, मैदान खाणाऱ्या सिडको बकासुरच करायचं काय... खाली डोकं वर पाय, पोलिस स्थानकाचा भूखंड खाणाऱ्या सिडकोचा निषेध असो, नेरुळकरांनो विकास हवा की गामी हवा अशा घोषणांनी महाराष्ट्र सैनिकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी आम्ही शांततेत आंदोलन केले आहे. परंतु जर येत्या 7 दिवसात सिडकोने हा व्यवहार रद्द नाही केला तर मनसे या भूखंडावर उद्यान, मैदान, दिव्यांग केंद्र, ज्येष्ठ नागरिक संघ, पोलिस स्थानकासाठी आरक्षित भूखंड असा फलक लावेल आणि या भूखंडावर गामी बिल्डरला एक वीटही रचू देणार नाही, असा इशारा गजानन काळे यांनी दिला. तसेच भगत सिंग यांच्यासारखं नागपूर अधिवेशनात घुसून आंदोलन करण्याचा इशारा काळे यांनी दिला. दरम्यान, धरणे आंदोलनात मनसेचे नवी मुंबईतील विविध पदाधिकारी आणि स्थानिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
विविध राजकीय पक्षाचा पाठिंबा
दरम्यान, मनसेच्या या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिला.शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, माजी नगरसेवक विशाल ससाणे, विभागप्रमुख विशाल विचारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चे दिलीप चव्हाण, प्रहार जनशक्ती चे मनोज टेकाडे, अजय तापकीर, सुनिल शिरीषकर, चंद्रकांत उतेकर, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना अध्यक्ष सुरेश मोकल, यांनी पाठिंबा दिला. तर नवी मुंबई सजग मंच चे सुधीर दाणी, नवी मुंबई जागृत रहिवासी संघ सुनील चौधरी सर, रणजित निंबाळकर, सुरेश साडे, सत्यवान आंब्रे ज्येष्ठ नागरिक संघ, सीवूड्स अध्यक्ष सुधाकर पाटील, माजी अध्यक्ष बाबा क्षिरसागर, खजिनदार शिवाजी बागडे, अरविंद जयकर यांनी सुद्धा पाठिंबा दिला.