Navi Mumbai : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. हा निर्णय घेतला गेला नाही तर 25 डिसेंबरपासून विमानतळावरून एकही विमान उडू देणार नाही, असा तीव्र इशारा खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केंद्र सरकारला दिला आहे. या नामांतराच्या मागणीसाठी 22 डिसेंबरपासून मानकोली नाका (भिवंडी) ते विमानतळापर्यंत पदयात्रा आंदोलन काढण्यात येणार आहे. हे आंदोलन कार, बाईक किंवा वाहनातून नव्हे तर सर्व भूमिपुत्र पायी चालत करणार असल्याचं खासदारांनी स्पष्ट केले.
दि बा पाटील यांचे नाव द्यावे या मागणीचा प्रस्ताव सव्वा तीन वर्षांपासून प्रलंबित
खासादर बाळ्या मामा म्हणाले “दि बा पाटील यांचे नाव द्यावे या मागणीचा प्रस्ताव सव्वा तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. अजूनही हा मुद्दा कॅबिनेट बैठकीत आला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहमती दर्शवली असल्याचे सांगितले होते, तरीही निर्णय होत नाही. सरकारने दिलेला शब्द पाळावा, नाहीतर आंदोलन अटळ आहे. 20 डिसेंबरपर्यंत विमानतळ नामांतराचा निर्णय न झाल्यास 22 तारखेला पदयात्रा सुरू होईल, आणि 25 डिसेंबरला विमानतळावरून एकही विमान उडू देणार नाही. स्थानिक भूमिपुत्रांची भूमिका स्पष्ट आहे. नाव दिले नाही तर तीव्र निषेध आंदोलन होणारच. स्थानिक भूमिपुत्रांमध्ये या आंदोलनाबाबत प्रचंड असंतोष असून, स्व. दि बा पाटील साहेब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरण आणि भूमिपुत्रांचा जनआक्रोश मोर्चा या नावाने मोठं आंदोलन उभं राहत आहे. सरकारने या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केली आहे.
25 डिसेंबर रोजी हे विमानतळ उड्डाणासाठी सुरु होणार
नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी 14 सप्टेंबर रोजी खासदार बाळ्या मामा यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ व जासई गावापर्यंत कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.त्यांनतर विमानतळाचे उदघाटन होऊ देणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी 3 ऑक्टोबर रोजी स्थानिक भूमिपुत्रांसोबत बैठक घेत दोन ते अडीच महिन्यात विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन दिले होते.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अश्वासनाला 3 डिसेंम्बर रोजी दोन महिने पूर्ण होणार असून 25 डिसेंबर रोजी हे विमानतळ उड्डाणासाठी सुरु होणार आहे.