Bocavirus In Navi Mumbai : लहान मुलांसाठी घातक असलेल्या 'बोका' व्हायरस (Bokavirus) शिरकाव नवी मुंबईत झाला आहे. अत्यंत दुर्मिळ म्हणून ओळखल्या जाणा-या बोका संसर्ग रोगाचा रूग्ण खारघर येथे आढळला असून नवी मुंबई, पनवेलमध्ये पाच लहान मुलांवर उपचार करण्यात आले आहेत. या लहान मुलांची सद्य परिस्थिती स्थिर असली तरी बोका व्हायरसमुळे लहान मुलांना धोका असून त्यांची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून पालकांना करण्यात आले आहे.
एका दोन वर्षांच्या चिमुरड्याला बोका व्हायरसचा संसर्ग झाल्यांनतर त्याला खारघर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संसर्ग झालेला व्हायरस हा टाईप 1 चा होता. त्याला श्वसनाचा त्रास होत असल्याने त्याची ऑक्सिजनची लेव्हल 85 पर्यंत खाली घसरली होती. त्यामुळे त्याच्यावर हाय फ्लो ऑक्सिजन, स्टिरॉइड्स, नेब्युलायझेशन आणि लक्षणात्मक उपचार तातडीने सुरू करण्यात आले. या मुलाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. गेल्या चार महिन्यांत बोका व्हायरसचा संसर्ग झालेल्या पाच बालकांवर उपचार करण्यात आले आहेत असे बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. संदीप सावंत यांनी सांगितले.
'बोका' व्हायरसचे नाक, शौच आणि रक्ताच्या नमुन्यांचे निदान पीसीआर चाचणीद्वारे केले जाऊ शकते. ही चाचणी खूप महाग असल्याने त्या चाचण्या नियमितपणे केल्या जात नाहीत. तीव्र स्वरूपाच्या श्वसनाचा त्रास असलेल्या मुलांमध्येच शक्यतो ही चाचणी केली जाते. या विषाणूच्या प्रादुर्भावाचे प्रमाण 1.5 टक्क्यांपासून ते 19.3 टक्क्यांपर्यत आहे. हा विषाणू वर्षभर आढळतो. परंतु, प्रामुख्याने हिवाळ्यात आणि हिवाळा तसेच उन्हाळ्याच्या मधल्या काही दिवसांमध्ये हा व्हायरस जास्त प्रमाणात आढळतो.
बोका संसर्गची 'ही' आहेत लक्षणे
बोका व्हायरस हा प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळून येतो. हिवाळ्यामध्ये या व्हायरसचा संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो. बोका व्हायरसमध्ये टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 4 सारखे अनेक प्रकार आहेत. टाईप 1 विषाणू प्रामुख्याने श्वसनमार्गाच्या संसर्गाशी संबंधित आहे. टाईप 2 आणि 4 अतिसार, ओटी पोटात दुखणे इत्यादी लक्षणांसह गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी म्हणजेच पोटाच्या विकाराशी संबंधित संसर्ग आहे. हा विषाणू प्रामुख्याने तीन वर्षांखालील मुलांना संक्रमित करतो. या विषाणूची लक्षणे इतर इन्फ्लूएंझा विषाणूंसारखीच आहेत. खोकला, सर्दी आणि श्वसनमार्गाच्या संक्रमणाचा यात प्रामुख्याने समावेश होतो. त्यामुळे हा व्हायरस लवकर ओळखणे आव्हानात्मक ठरत आहे.
महत्वाच्या बातम्या :
Viral Disease : कोरोनासोबतच डेंग्यूही बळावतोय! दोन्हीपैंकी कोणत्या विषाणूची लागण झाली आहे 'असं' ओळखा