नाशिक : न विचारता बाईक वापरल्यामुळे दीराने वहिनीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. आरोपी मुरारी चव्हाणला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
इंदिराबाई चव्हाण ही महिला काही कामानिमित्त मामेदीर मुरारी चव्हाणची दुचाकी घेऊन बाहेर गेली. ती परतल्यानंतर मुरारीला हा प्रकार लक्षात आला. मात्र आपली संमती घेतल्याशिवाय दुचाकी वापरलीच कशी या रागातून त्याने वहिनीवर कोयत्याने वार केले.
आरोपीने केलेल्या कोयत्याच्या हल्ल्यात इंदिराबाईंचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री अंबडमधल्या दत्तनगर परिसरात ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी सकाळी आरोपी मुरारीला ताब्यात घेतलं असून अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.