यावेळी 'भारत माता की जय', 'शहीद संदीप ठोक अमर रहे' अशा घोषणा देत गावकऱ्यांनी संदीप यांना श्रद्धांजली वाहिली. त्याचप्रमाणे 'पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणाही देण्यात आल्या. शहीद संदीप यांच्या मृत्यूनं अवघ्या गावावर शोककळा पसरली आहे. खडांगळी गावात ठोक यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारो नागरिक लोटले होते.
वरातीऐवजी अंत्ययात्रा, नाशिकचे शहीद ठोक यांचं कुटुंब शोकसागरात
ज्या घरातून लग्नाची वरात निघणार होती, त्या घरातून आता अंत्ययात्रा काढण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. उरीमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले नाशिकचे शिपाई संदीप सोमनाथ ठोक यांच्या कुटुंबीयांना लाडक्या मुलाच्या मृत्यूमुळे शोक अनावर झाला. मुलाच्या आठवणी सांगताना कुटुंबीयांना भावना अनावर होतात.
शहीद संदीप ठोक हे नाशिकच्या खडांगळी गावचे रहिवाशी. घरात सर्वात लहान असलेला संदीप सर्वांचा लाडका होता. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आलेल्या वीरमरणामुळे अवघा परिवार शोकसागरात बुडाला आहे.
संदीपचे वडील सोमनाथ कांदा उत्पादक शेतकरी आहेत. संदीपच्या शेतात सडलेल्या कांद्याचा सडा पडलेला दिसतो. त्याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ योगेश आणि दोन विवाहित बहिणी आहेत.
अकराव्या प्रयत्नात यश :
दहा वेळा लष्कराच्या भरती प्रक्रियेत अयशस्वी होऊनही संदीपने जिद्द सोडली नाही. चिकाटीने सराव करत अकराव्या प्रयत्नात तो लष्करात दाखल झाला. जुलै 2014 मध्ये संदीप लष्करात भरती झाला. बिहार रेजिमेंट 6 मध्ये तो कार्यरत होता.
शत्रूशी लढताना शहीद झालेला संदीप हा सिन्नरच्या भूमीवरचा पाचवा जवान आहे. अभिमानाची बाब म्हणजे दीड हजार लोकसंख्या असलेल्या खडांगळी गावातील 10 युवक लष्करात आहेत.
तीन शहीदपुत्रांवर आज अंत्यसंस्कार :
उरीमध्ये शहीद झालेल्या महाराष्ट्रातील इतर तीन शहीद जवानांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होतील. साताऱ्याच्या माण तालुक्यातील जाशी गावचे चंद्रकांत गलांडे, अमरावतीच्या नांदगावचे विकास उईके आणि यवतमाळच्या वणीचे विकास कुळमेथे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होतील.
बारामुल्लाच्या उरी इथल्या सैनिकी मुख्यालयावर दहशतवाद्यांनी बेसावध असणाऱ्या जवानांवर गोळीबार आणि हँण्डग्रेनेडनं हल्ला केला. ज्यात एकूण 18 जवान शहीद झाले. महाराष्ट्राच्या चार जवानांनी आपलं बलिदान दिलं. राज्य सरकारनं पीडित कुटुबांना प्रत्येकी 15 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.
शहीद जवान चंद्रकांत गलांडे यांचं पार्थिव काल रात्री उशिरा साताऱ्यात दाखल झालं. त्यानंतर शासकीय रुग्णालयातून सकाळी जाशी या त्यांच्या मूळगावी ते रवाना होईल.